Ajit Pawar- पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात दहशत असलेल्या गजा मारणेसह त्याच्या आणि बंडू आंदेकरच्या कुटुंबातील महिलांना उमेदवारी दिली. गुंड बापू नायर, गुंड देविदास चोर्धे या दोघांच्या पत्नीला तिकीट दिले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर याबाबत चहूबाजूने टीका होऊ लागल्यावर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी याचे खापर मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटावर फोडत या वादापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही गुन्हेगाराला उमेदवारी दिलेली नाही. आमची सचिन खरात यांच्या गटासोबत युती आहे. त्यांनी त्यांच्या जागांवर हे उमेदवार दिले. मात्र ते खरातांचे उमेदवार असले तरी त्यांना अजित पवार यांची मान्यता आहेच, कारण ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांचा युक्तिवाद चांगलाच आपटला आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणेने पालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर उमेदवारी दाखल केली आहे. तर आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी गुंड बंडू आंदेकर याची भावजय लक्ष्मी आणि सून सोनाली यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे. हे सगळे सध्या तुरुंगात असून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी तुरुंग प्रशासनाकडून विशेष परवानगी घेतली आहे. गुंड गजा मारणे आणि बंडू आंदेकर या दोघांच्या टोळ्यांचे कारनामे राज्यभर ठाऊक आहेत. तरीही त्यांच्या सदस्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेच गुंड बापू नायर याच्या पत्नीलाही पुण्यातून तिकीट दिले आहे. तर भाजपाने अपहरण, खंडणी आणि गोळीबाराच्या आरोप असलेल्या देविदास चोर्धे याच्या पत्नीला उमेदवार बनवले आहे. त्यावरून विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाला धारेवर धरले आहे. विशेष म्हणजे, गुंडांना टायरमध्ये घालून झोडा, अशी भाषा काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनीच केली होती.
या तिकिटवाटपावरून राज्यभर संताप व्यक्त झाल्यानंतर अजित पवार यांनी मित्रपक्ष खरात गटाला जबाबदार धरत म्हटले की, आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये आमची सचिन खरात गटासोबत युती होती. पालिका निवडणुकीत त्यांना काही जागा देण्यात आल्या आहेत. ज्या पक्षाशी युती केली जाते, त्या पक्षाला आपल्या वाट्याच्या जागांवर उमेदवार ठरवण्याचा पूर्ण अधिकार असतो. राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. मी यासंदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. सगळ्यांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांनी एवढीच प्रतिक्रिया दिली की, अजित पवारांशी याबाबत सविस्तर बोलेन.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह भाजपाने महानगरपालिका निवडणुकांमध्ये गुंडांना आणि गुंडांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी सवाल केला की, राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का? गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंधित व्यक्ती जनतेच्या हिताची कामे करतील का? पुण्यात दहशत असलेल्या आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील दोन महिलांना अजित पवारांच्या पक्षाने तिकीट दिले. नगरसेवकाचे काम कचरा व्यवस्थापन, गटारांची सफाई, पाणीपुरवठा आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा देणे हे असते. ज्या महिला स्वतः तुरुंगात आहेत, त्या तुरुंगामधून या सोयी नागरिकांना कशा काय पुरवणार?
हे देखील वाचा –
पुण्यातील राजकीय ड्रामा; एबी फॉर्म गिळून दिला प्रतिस्पर्ध्याला धक्का
अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार रहस्यमय पद्धतीने गायब; निवडणूक बिनविरोध करण्याचा आरोप














