Mumbai mayor – 29 महापालिकांच्या निवडणुका होऊन निर्णय झाला असला तरी अजून राजकीय वातावरण शांत झालेले नाही. जनतेने आपला कौल दिला असला तरी जनमताला धुडकावून राजकीय पक्ष आपला महापौर बसविण्यासाठी वाटेल ती समीकरणे घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंबईत तर एकनाथ शिंदे यांचे विजयी उमेदवार आपला विजय साजरा करण्याऐवजी ताज हॉटेलमध्ये कैदेत बसले आहेत. कल्याण, डोंबिवली, चंद्रपूर, कोल्हापूर, ठाणे, मालेगाव, इस्लामपूर अशा अनेक पालिकांत महापौरपदासाठी चढाओढ, फोडाफोडीचे राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे. अशातच मुंबईत उबाठाला एक मोठी आशा निर्माण झाली आहे. येत्या गुरुवारी 22 जानेवारीला महापौरपदाचे आरक्षण करण्यात येणार आहे. या आरक्षणात जर मुंबईचा महापौर हा अनुसूचित जमातीचा असण्याचा निर्णय झाला तर थेट उद्धव ठाकरे गटाचा नगरसेवक महापौरपदी बसणार आहे. याचे कारण मुंबईत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांपैकी केवळ उद्धव ठाकरे गटाकडे अनुसूचित जमातीचे दोन नगरसेवक आहेत. यामुळेच उद्धव ठाकरे म्हणाले होते त्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर गुरुवारी उद्धव ठाकरे यांचा मुंबईत महापौर बसेल आणि त्यानंतर धक्कादायक राजकारण सुरू होईल.
उद्धव ठाकरेंकडे दोन हुकुमाचे एक्के आहेत. निवडणुकीपूर्वी नगरसेवकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 2 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होत्या. प्रभाग 53 आणि प्रभाग 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन मतदारसंघात सर्व पक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी उबाठाचेच उमेदवार विजयी झाले आहेत. अशा परिस्थितीत 22 जानेवारीला महापौरपदासाठीच्या आरक्षण सोडतीत महापौरपद जर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जाहीर झाले तर ठाकरेंना लॉटरी लागू शकते. प्रभाग 53 मधून उबाठाचे अनुसूचित जमातीचे जितेंद्र वळवी यांनी बाजी मारली, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेचे अशोक खांडवेंचा पराभव केला. तर प्रभाग 121 मधून उबाठाच्या अनुसूचित जमातीच्या प्रियदर्शनी ठाकरे यांचा विजय झाला आहे. प्रियदर्शनी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या उमेदवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला. त्यामुळे महापौराचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी झाले तर जितेंद्र वळवी किंवा प्रियदर्शनी ठाकरे या दोघांपैकी एकाला महापौरपद बहाल होईल आणि सगळाच खेळ उलटवला जाईल.
मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कोणाचा होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुतीचे नेते आपलाच महापौर होणार असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात सत्तेतील वाट्यावरून वाद सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष या दोन महत्त्वाच्या पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. सगळ्यात मोठा पक्ष असल्याने भाजपाचा या दोन्ही पदांवर दावा आहे. मुंबईमध्ये भाजपाचे 89 नगरसेवक जिंकून आले आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक जिंकून आले आहेत. संख्याबळ पाहता जर शिंदेंच्या शिवसेनेने दगाफटका केला तर दोन महत्त्वाची पदे हातून जाण्याची भाजपाला भीती आहे. मुंबईमध्ये शिंदे गटाने दबावतंत्र वाढवल्यानंतर भाजपाकडून ठाण्यात डाव टाकण्यास सुरुवात झाली. ठाण्याचे भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यामध्ये अडीच वर्षे महापौरपद, स्थायी समितीचे अध्यक्ष पद व सभागृह नेतेपद काही वर्षांसाठी मिळावे, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर शिंदे सेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी म्हटले की, त्यांनी सर्व पदे मागितली तर आम्ही देऊ. याबद्दल आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे निर्णय घेतील. म्हस्के यांनी इतकेच बोलून वेळ मारून नेली.
तिकडे जागतिक आर्थिक परिषदेसाठी दाओसमध्ये असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये, दाओस दौर्यानंतर एकत्र बसून यावर आपण तोडगा काढायचा, असे यावेळी ठरवण्यात आले. त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले की, जिथे जिथे महायुती म्हणून लढलो तिथे महायुतीचाच महापौर होईल, जनतेने दिलेला कौल महायुतीला आहे. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन लढलो. आम्हाला काय मिळाले त्यापेक्षा आम्ही मुंबईला काय देऊ शकतो हे महत्त्वाचे आहे. मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. या वक्तव्याने त्यांनी तर्क-वितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे नगरसेवक अजूनही हॉटेलात बंदिस्त आहेत. त्यात भाजपाने आज त्यांच्या नगरसेवकांना मुंबई सोडून न जाण्याची सूचना दिली. यामुळे चर्चा सुरू राहिली आहे.
त्याआधी आज सकाळीच उबाठाचे संजय राऊत यांनी म्हटले की, शिंदे गटाकडे केवळ 29 जागा असताना शिंदे यांना मुंबईचे महापौरपद मागण्यासाठी दिल्लीतून कोण चावी मारते आहे? त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असेही पसरवण्यात आले. भाजपाला मदत करून 2017 ची परतफेड उद्धव ठाकरे करणार अशी चर्चा सुरू करण्यात आली. ‘मातोश्री’वर ही खबर पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी स्वतः खुलासा करून चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यानीही ठाकरे यांच्याशी आपली कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण केले. तिकडे एकनाथ शिंदेच्या नवीन नगरसेवकांचा पालिकेतील गट स्थापन करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. एकदा गट स्थापन करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली की नगरसेवकांना बाहेर जाता येईल असे सांगितले गेले.
ठाण्यातही अडीच वर्ष महापौरपदाची
मागणी! भाजपा विरोधी भूमिकेच्या तयारीत
मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी भाजपा आणि शिंदे गटामध्ये अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहेत, त्याचे पडसाद आता ठाण्यातही उमटू लागले आहेत. ठाणे महानगरपालिकेत भाजपाला किमान अडीच वर्षांसाठी महापौरपद मिळावे, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. महत्त्वाची पदे मिळाली नाहीत, तर भाजपा सत्तेत राहणार नाही आणि थेट विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेईल, असा थेट इशाराच डावखरे यांनी दिला. मुंबईतील महापौरपदावरून सुरू असलेल्या राजकीय दबावतंत्राला उत्तर म्हणूनच ठाण्यात हा मोठा डाव टाकण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निरंजन डावखरे म्हणाले की, ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला बहुमत मिळाले. पण आमचाही सन्मान झाला पाहिजे. भाजपाने शीळ ते वडवली पट्ट्यात अत्यंत प्रभावी कामगिरी केली. महायुतीत झालेल्या जागावाटपाच्या चर्चेत भाजपाच्या वाट्याला आलेल्या 11 जागा या मुंब्रा आणि राबोडी या मुस्लीमबहुल मतदारसंघातील होत्या. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपाने 1 नंबर प्रभागापासून ते 29 नंबर प्रभागापर्यंत, म्हणजे मीरा-भाईंदरकडील पहिल्या टोकापासून पनवेल-कलोजाकडे जाणार्या ठाण्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शंभर टक्के स्ट्राईक रेट राखत सर्व 28 च्या 28 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पक्षाने जाहीरनाम्यात ठाणेकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेत भाजपाला योग्य भूमिका मिळणे आवश्यक आहे.
ती भूमिका न मिळाल्यास ठाणेकरांना दिलेले शब्द पाळण्यासाठी जी भूमिका घ्यावी लागेल ती आम्ही नक्की घेऊ. ठाण्याच्या विकासाचा रोडमॅप पूर्ण करायचा असेल तर महापौरपद, सभागृह नेतेपद किंवा स्थायी समिती अध्यक्षपद यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदार्या किमान अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी मिळणे गरजेचे आहे. कारण कोणतेही पद प्रभावीपणे सांभाळण्यासाठी किमान एक वर्ष समजून घेण्यात जातो. तसेच प्रशासनात पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी सत्तेबाहेर जावे लागले तरी भाजपा त्यासाठी तयार आहे. कारण सत्तेतील पदांपेक्षा ठाणेकरांचे हित आणि त्यांना न्याय देणे हेच आमचे प्राधान्य असून, ठाणे महानगरपालिकेत विकास, पारदर्शक प्रशासन आणि जबाबदारीची व्यवस्था राबवण्यासाठी भाजपा योग्य ती भूमिका निश्चितपणे घेईल. शिळ ते वडवली भाजपा वाढवली, असे बॅनर एकनाथ शिंदे यांच्या घराच्या परिसरात तसेच शहरातील विविध भागांत लावण्यात आले आहेत. यावर डावखरे म्हणाले की, हा संदेश मुळात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठीच हे बॅनर लावण्यात आले असून, कोणावर चिमटे काढणे किंवा टोमणे मारणे हा त्यामागचा उद्देश नाही. भाजपाची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे.
—————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
मुंबई महापालिकेत मनसेच्या गटनेतेपदी यशवंत किल्लेदारांची नियुक्ती
वसईच्या खोल समुद्रात रहस्यमय गोलाकार रिंगण, मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण









