Home / महाराष्ट्र / MVA MNS Morcha-दुबार तिबार मतदार दिसला की, बडवून काढा ! ठाकरे बंधूंचे आव्हान! आयोगाविरुध्द शक्तिप्रदर्शन

MVA MNS Morcha-दुबार तिबार मतदार दिसला की, बडवून काढा ! ठाकरे बंधूंचे आव्हान! आयोगाविरुध्द शक्तिप्रदर्शन

MVA MNS Morcha- मतदार यादीतील बोगस मतदार, दुबार मतदार या विरोधात आज विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले! सत्याच्या...

By: Team Navakal
MVA MNS Morcha
Social + WhatsApp CTA

MVA MNS Morcha- मतदार यादीतील बोगस मतदार, दुबार मतदार या विरोधात आज विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले! सत्याच्या मोर्चात (MVA MNS Morcha)दोन्ही ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला आव्हान देत नागरिकांना आदेश दिला की दुबार, तिबार मतदार दिसला की, त्याला तिथेच बडवून काढा.  मविआ  आणि  मनसे मतचोरीच्या  विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. आज दोन्ही ठाकरे बंधू, शरद पवार, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील अशा विरोधकांनी एकत्र येत लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी पालिका परिसरात मोठा मोर्चा काढला. यानंतर निवडणूक आयोग मतदार याद्या सुधारण्याचा निर्णय घेते की, या विरोधाकडे पूर्ण दुर्लक्ष करीत पुढील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करते याकडे लक्ष आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यापासून महत्वाच्या नेत्यांची भाषणे सुरु झाली. बाळासाहेब थोरात म्हणाले की, आजचा हा अभूतपूर्व मोर्चा आहे. हा मोर्चा निवडणूक आयोगावर आहे. देशाची निवडणूक ही मतचोरीतून होत आहे हे राहुल गांधी यांनी दाखवून दिले. त्यावेली हेही लक्षात आले की महाराष्ट्रात बोगस मतदान झाले, आम्ही मागणी केली की विधानसभेची मतदार यादी आताच्या निवडणुकीला वापरू नका, पण ते ऐकत नाहीत, संगमनेरच्या माझ्या ग्रामीण भागात साडेनऊ हजार बोगस मतदार आहेत. मात्र ही दुरुस्त होऊ शकत नाही असे आयोग म्हणते. त्यांनी नगरपालिकेच्या याद्या तशाच जाहीर केल्या. मतदार याद्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका हा आमचा आग्रह आहे.

राज ठाकरे हे बाळासाहेब थोरात यांच्यानंतर भाषणाला उभे राहिले. ते म्हणाले की, आजचा मोर्चा हा राग दाखविण्यासाठी, ताकद दाखविण्याचा, दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. हा विषय मोठा नाही. आम्ही सांगत आहोत की यात दुबार मतदार आहेत. भाजपा, शिंदे, अजित पवार यांचेही लोक म्हणत आहेत की, दुबार मतदार आहेत. मग निवडणूक होण्याची घाई का आहे? याद्या साफ करून निवडणूक घ्या. मग जो निकाल येईल तो मान्य आहे. हे 24,500 मतदार कल्याण ग्रामीण, भिवंडी, डोंबिवलीचे आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईत मलबार हिल येथे मतदान केले आहे. त्यांनी तिथेही मतदान केले. प्रभाकर पाटील, गजानन भोईर, राम भोईर यांनी तिकडे मतदान केले आणि मलबार हिल येथेही मतदान केले. मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर दक्षिण, मुंबई दक्षिण, नाशिक, मावळ, पुणे, ठाणे येथे हजारो दुबार मतदार आहेत. (याचा पुरावा म्हणून त्यांनी दुबार मतदारांच्या कागदपत्रांचा आणलेला ढीग दाखवला.) हे सर्व दाखविले तरी निवडणुका घेतात. यातून लोकशाही टिकेल का? नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर, सुलभ शौचालयात मतदार नोंदवले गेले आहेत, मी ईव्हीएम मशीनचा घोटाळा दाखवला. ही कारस्थाने निवडणूक आयोगाच्या मार्फत सुरू आहेत. मॅच अगोदर फिक्स आहे, मग मतदान काय करायचे? जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा घराघरात जा, मतदानाला दुबार, तिबार आले तर तिथेच त्यांना बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हाती द्यायचे.

राज ठाकरेंनंतर उध्दव ठाकरे भाषण करताना म्हणाले की, ही लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्यांची एकजूट आहे. इतके पुरावे दिल्यावरही आयोग काही करत नाही, आज महाराष्ट्र देशाला दिशा दाखवित आहे. मतदारांनी आपली नावे आहेत की नाही ते तपासा, आपल्या पत्त्यावर अनोळखी नावे नाहीत ना हे पाहावे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तपासणीसाठी एक अर्ज केला आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी हा अर्ज केला नाही. त्यामुळे त्यांना माहीतच नाही, या अर्जावरचा फोन नंबर चुकीचा आहे. सक्षम ॲपवरून परवा हा अर्ज केला आहे. याचा अर्थ आमच्या कुटुंबातील सर्वांची नावे बाद करण्याचे ते षड्यंत्र असावे, म्हणजे याचा सर्व्हर कुणाच्या तरी कार्यालयात आहे. सदोष आणि चोरी करून निकाल ठरवणार असाल तर ही निवडणूक नको. आजपासून मतचोर जिथे दिसेल तिथे लोकशाही मार्गाने त्याला फटकवा. आम्ही न्यायालयात जाणार आहोत. त्या न्यायालयात न्याय मिळाला नाही तर तुम्ही साथ द्या.

शेवटचे भाषण करताना शरद पवार म्हणाले की, तुमची एकजुट पाहून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण होते. लोकशाहीने मतदानाला दिलेल्या हक्काचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. विधानसभेत जे प्रकार झाले त्यामुळे सामान्य माणसाला धक्का बसला, अनेकजण अस्वस्थ आहेत. मतदानाचा हक्क टिकवायचा असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल. या मोर्चानंतर निवडणूक आयोग आता मतदार यादीची पुन्हा पडताळणी करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सपकाळ-गायकवाड अनुपस्थित

काँग्रेसचे झेंडे व बॅनरही गायब

मुंबई – मतदार चोरी आणि मतदार याद्यांतील घोळांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने संयुक्तपणे काढलेल्या सत्याच्या मोर्चा दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड हे अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे केवळ मोर्चालाच नव्हे, तर महाविकास आघाडीच्या अलीकडील बैठकींनाही गैरहजर राहिले होते. त्यामुळे काँग्रेस आता आघाडीतून अंतर ठेवण्याच्या विचारात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर मोर्चासाठी आयोजकांनी महापालिका मुख्यालय ते फॅशन स्ट्रीटपर्यंत मोर्चात सहभागी झालेल्या विविध पक्षांचे झेंडे रस्त्याच्या मध्यभागी लावून लोकांचे लक्ष वेधले होते. मात्र, या विविध पक्षीय झेंड्यामध्ये काँग्रेस पक्षाचा तिरंगा आणि पंजा चिन्ह असलेल्या झेंड्यांचा अभाव होता. त्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये होती. मोर्चा मार्गात असलेल्या मुंबई काँग्रेस कार्यालयासमोर देखील काँग्रेसचे झेंडे लावण्यात आले नव्हते. संपूर्ण मोर्चा मार्गात सुद्धा काँग्रेसचा झेंडा दिसत नव्हता. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. दुसरीकडे उबाठा, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट, मार्क्सवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे जागोजागी उठून दिसत होते.

परवानगीविना मोर्चा

मुंबई – मतचोरी आणि मतदार यादीतील गोंधळ या विरोधातील सत्याचा मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगीच दिली नव्हती. त्यामुळे हा मोर्चा विनापरवानगीच निघाला. पोलिसांनी आयोजकांना विनापरवानगी मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळ सर्व्हेलन्स गाड्या तैनात केल्या होत्या. सहा सीसीटीव्ही कॅमेरे लावलेल्या या गाड्यांच्या माध्यमातून मोर्चाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले होते. मात्र, पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.

मनसैनिक-ट्रॅफिक पोलिसांमध्ये

खालापूर टोलनाक्यावर बाचाबाची

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील खालापूर टोल नाक्यावर आज मनसे कार्यकर्ते आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये वाद झाला. पुणे आणि आसपासच्या भागांतून सत्याच्या मोर्चासाठी मनसे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. यातील एका कार्यकर्त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटवर पेपर चिकटवला होता. ट्रॅफिक पोलिसांनी ती गाडी थांबवली आणि चौकशी सुरू केली. त्यानंतर वाहनचालक आणि पोलिसांमध्ये तीव्र बाचाबाची झाली. वाहन चालक म्हणाले की, आमच्या गाडीवर स्टिकर होता, तो आम्ही काढत होतो. गाडी साईडला घेत होतो, तेव्हा पोलिसांनी मागून येऊन गाडीवर जोरात थाप मारली. आता त्यांनी हात मारला की लाथ मारली, हे आम्हाला ठाऊक नाही. त्यामुळे आम्ही त्यांना विचारायला गेलो की साहेब, आम्ही गाडी साईडला घेत होतो, तुम्ही का थाप मारली, काय झाले? त्यानंतर सुमारे 12-15 ट्रॅफिक पोलीस तिथे जमा झाले. आम्ही गाडी साईडला घेऊन नीट स्टिकर काढत होतो, पण त्यांनी आम्हाला साईडला घेऊ दिले नाही.

ट्रॅफिक पोलिसांनी सांगितले की, आमची दैनंदिन कारवाई सुरू असते. सध्या एक्स्प्रेसवेवर सीटबेल्टसह विविध नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने त्यांना मोठे दंड होत आहेत. म्हणूनच आम्ही वाहनचालकाला विचारलं की नंबरप्लेट का लपवली आहे, चिकटपट्टी का लावली आहे. सुरुवातीला तो व्यक्ती माझ्याशी वादविवादाच्या भाषेत बोलू लागला आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. मी त्याला सांगितले साहेब, नंबरप्लेटची चिकटपट्टी काढा आणि पुढे जा.

राज ठाकरेंचा लोकलने प्रवास

आजच्या सत्याचा मोर्चासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरहून चर्चगेटपर्यंत लोकलने प्रवास करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चासाठी सामान्य मुंबईकरांप्रमाणे प्रवास करणार असल्याचे त्यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ते दादर स्थानकावर पोहोचले. पण बोरिवली आणि विरार येथून आलेल्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्यांना दोन लोकल सोडाव्या लागल्या. त्यानंतर त्यांनी 10.38 वाजताची चर्चगेटकडे जाणारी धिमी लोकल पकडली. ते प्रथम श्रेणी डब्यात खिडकी जवळच्या सीटवर बसले होते. यावेळी त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, सरदेसाई आदि पक्षातील प्रमुख नेते आणि सुरक्षारक्षकांचा ताफा होता. पत्रकारही मोठ्या संख्येने होते. अकरा वाजताच्या सुमारास ते चर्चगेट स्थानकावर पोहोचले. याठिकाणी मनसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर ते चर्चगेट स्थानकाजवळील वेस्ट एंड हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन थांबले. राज ठाकरे यांनी यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे आणि कोंडीमुळे कल्याण ते दादर तसेच डोंबिवलीवरून लोकलने प्रवास केल्याचे एका भाषणात सांगितले होते. तर महाविद्यालयीन काळात ते जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असताना वांद्रे येथून सीएसएमटीपर्यंत हार्बर मार्गाने दररोज लोकलने प्रवास करायचे असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे.

15 ऑक्टोबरपर्यंतची यादी

वापरण्याची आयोगाची मागणी

आगामी निवडणुकांसाठी 15 ऑक्टोबर 2025 पर्यंतची अद्ययावत मतदारयादी वापरण्याची परवानगी देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. यापूर्वी निवडणुकीसाठी 1 जुलैपर्यंतची यादी वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यावर विरोधकांनी टीका करत ही यादी अद्ययावत करण्याची मागणी केली होती. मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि मतदार नावांवरील तक्रारी दूर करण्यासाठी आयोगाने स्थानिक अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले आहेत. मतदार यादीतील दुबार नावांपुढे ताऱ्यांचे चिन्ह उमटवण्याचे निर्देश दिले आहेत.

आम्ही कधी झुकणार नाही! फायर आजीचा इशारा

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ही मुंबई आहे. आम्ही कधी झुकणार नाही असा इशारा आज चंद्रभागा शिंदे उर्फ फायर आजीने सत्याच्या मोर्चात दिला. 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात, राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी शिवसैनिकांनी मातोश्री भोवती कडे केले आणि या आंदोलनादरम्यान ठाण मांडून बसलेल्या एका वृद्ध शिवसैनिक महिला फायर आजी चर्चेत आल्या होत्या. त्या आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब परळ येथे फायर आजीच्या घरी भेट देऊन त्यांना साडी भेट दिली होती. त्या उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत आणि आंदोलनात सक्रियपणे सहभागी होत असतात. आजही त्या मोर्चात उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. फायर आजी म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी मी या मोर्चात आले आहे. बोगस मतदारांची चौकशी झालीच पाहिजे. उद्धव ठाकरे हे त्या चोरांसारखे लबाड नाहीत. या प्रकरणात मतचोरीविरोधी निर्णय झाला पाहिजे. आम्ही कधीच झुकणार नाही, हा सत्याचा मोर्चा आहे आणि सत्याचाच विजय होईल. कितीही कुत्रे भुंकले तरी आम्हाला न्याय मिळणारच. ही हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई आहे आणि ती त्यांचीच राहणार आहे.

-=—————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

अलीगढच्या मंदिरावर हिंदूंनीच ‘आय लव्ह मोहंमद ‘ लिहिले

तटकरेंचा शेवटचा हिशोब चुकता करणार! आमदार दळवींचा इशारा

३ नोव्हेंबरला राज्यातील वकीलांचे एक दिवस कामबंद आंदोलन

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या