Home / महाराष्ट्र / AIMIM Controversy: सहर शेख यांच्या माफीनाम्यानंतर इम्तियाज जलील आक्रमक; “महाराष्ट्र हिरवा करू” म्हणत दिला इशारा

AIMIM Controversy: सहर शेख यांच्या माफीनाम्यानंतर इम्तियाज जलील आक्रमक; “महाराष्ट्र हिरवा करू” म्हणत दिला इशारा

AIMIM Controversy: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंब्रा शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एमआयएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी...

By: Team Navakal
AIMIM Controversy
Social + WhatsApp CTA

AIMIM Controversy: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंब्रा शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एमआयएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी विजयानंतर केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी सहर शेख यांनी माफीनामा दिला असला, तरी पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांची पाठराखण करत नवा वाद छेडला आहे. “येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू,” असे विधान जलील यांनी केल्याने आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

नेमके प्रकरण काय?

मुंब्र्यात एमआयएमने 5 नगरसेवक निवडून आणत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. या विजयानंतर बोलताना सहर शेख म्हणाल्या होत्या की, “कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है.” त्यांच्या या विधानावर भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे आणि विविध हिंदू संघटनांनी आक्षेप नोंदवत पोलिसांत तक्रार केली होती.

मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी सहर शेख यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी लेखी माफीनामा सादर केला. “माझ्या विधानाचा अर्थ पक्षाचा झेंडा आणि निशाणी असा होता, कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकला.

इम्तियाज जलील यांचा पोलिसांवर हल्लाबोल

सहर शेख यांची भेट घेण्यासाठी मुंब्र्यात आलेले इम्तियाज जलील माध्यमांशी बोलताना कमालीचे आक्रमक दिसले. ते म्हणाले, “आमच्या एका मुलीने केलेल्या विधानावर इतका गदारोळ का? भाजपचे नेते नितेश राणे किंवा इतर पदाधिकारी जेव्हा भडकावू भाषणे करतात, तेव्हा पोलीस गप्प का बसतात? महाराष्ट्र पोलीस काय भाजपचे गुलाम झाले आहेत का?”

जलील यांनी पुढे सवाल केला की, केवळ चार-पाच लोक दबाव टाकतात म्हणून नोटीस दिली जाते का? आम्ही कायद्याचा मान राखतो, पण जर दबावाचे राजकारण होणार असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही.

“आम्ही माघार घेणार नाही”

सहर शेख यांच्या विधानाचे समर्थन करताना जलील म्हणाले की, आम्ही राजकारण करायला आलो आहोत आणि आमची ताकद वाढली आहे. सत्तेचा गैरवापर करून आम्हाला नोटीस पाठवली जात असेल, तर आम्ही त्याला घाबरत नाही. “आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात आहोत आणि आगामी काळात महाराष्ट्रात हिरवा रंग अधिक व्यापकपणे पसरवू,” असे म्हणत त्यांनी आपल्या पक्षाच्या विस्ताराचा निर्धार व्यक्त केला.

या सर्व घडामोडींमुळे मुंब्र्यासह संपूर्ण ठाण्यात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या