पुणे – कोंढव्यातील (Kondhwa) लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांना फिर्याद दिलेल्या संगणक अभियंता तरुणीच्या मित्राला पोलिसांनी नोटीस (notice)बजावली आहे. या प्रकरणात मित्राला अटक करण्यात येणार नसून केवळ चौकशीसाठी बोलवले जाणार आहे.
कोंढवा परिसरात उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर २ जुलै रोजी साडेसात वाजताच्या सुमारास डिलिवरी बॉयकडून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे ५०० पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते.
या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून पोलिसांनी २० पथके तयार केली. त्यांनी जवळपास २५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्या आधारे संशयित तरुणाला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. पोलीस तपासात तो कुरिअर कंपनीतील कर्मचारी नसून तरुणीचा मित्र असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, संबंधित मित्राला अटक करण्यात येणार नसून, केवळ चौकशीसाठी सहकार्य करण्यास तसेच पोलिसांनी बोलावल्यास ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. याशिवाय तरुणाला पुणे शहराबाहेर जाण्यास मनाईही करण्यात आली आहे.
