Indian Army Recruitment 2026: भारतीय सैन्य दलात सामील होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सैन्य दलाने ‘अग्निवीर’ भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून, राज्यातील विविध जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांना ठराविक मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
या जिल्ह्यांतील तरुण करू शकतात अर्ज
पुणे येथील विभागीय भरती कार्यालयाने (ZRO) दिलेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची खिडकी 13 फेब्रुवारीपासून उघडली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2026 आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील जिल्ह्यांतील उमेदवार पात्र ठरतील:
- पुणे
- सोलापूर
- छत्रपती संभाजीनगर (अहिल्यानगर)
- धाराशिव
- बीड
- लातूर
निवड प्रक्रिया आणि परीक्षेचे वेळापत्रक
या भरतीसाठीची लेखी परीक्षा 1 जून ते 15 जून 2026 या कालावधीत होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल. यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणीचा समावेश असेल. हे सर्व टप्पे यशस्वीपणे पार करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
सातारा येथे मिळणार प्रशिक्षणाची सोय
भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) सरसावले आहे. साताऱ्यातील मेस्को करिअर अकॅडमीमध्ये उमेदवारांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
- विविध पदे: जनरल ड्युटी (GD), लिपिक, स्टोअर कीपर, नर्सिंग असिस्टंट आणि तांत्रिक पदांसाठी येथे मार्गदर्शन मिळेल.
- तज्ज्ञ मार्गदर्शक: अनुभवी प्रशिक्षकांकडून लेखी आणि शारीरिक चाचणीची तयारी करून घेतली जाईल.
- सुविधा: प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरुणांना साताऱ्यातील या प्रशिक्षण सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करावी, असा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.










