Indigo’s confusion – इंडिगो (Indigo) एअरलाईन्समुळे देशातील विमानतळांवर निर्माण झालेली प्रचंड गोंधळाची स्थिती अजूनही पूर्ण निवळली नसताना काँग्रेसने आज केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला. अदानी (Adani) समूहाचा फायदा करण्यासाठी हा गोंधळ जाणीवपूर्वक घडवण्यात आला का? असा सवाल करणारा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे.
काँग्रेसने या व्हिडिओत म्हटले आहे की, 27 नोव्हेंबर रोजी अदानी समूहाने भारतातील सर्वात मोठी फुल फ्लाईट सिम्युलेटर ट्रेनिंग कंपनी (एफएसटीसी) खरेदी केली. त्याच्यानंतर अगदी तीन दिवसांतच इंडिगोची उड्डाणे मोठ्या प्रमाणावर रद्द होणे, विमाने उशिरा उडणे आणि वैमानिक उपलब्ध नसणे या बातम्यांची देशभरात चर्चा सुरू झाली. त्यामुळे वैमानिक प्रशिक्षण आणि वैमानिक भरती यावर खास लक्ष देण्याची गरज असल्याचे वातावरण तयार झाले. अदानीने जी कंपनी ताब्यात घेतली ती नेमके वैमानिक प्रशिक्षणच करते. त्यामुळे वैमानिकांचा तुटवडा असल्याचे जे वातावरण तयार केले ते अदानीचा फायदा होण्यासाठी जाणीवपूर्वक केलेले नियोजन आहे का? की हा फक्त योगायोग आहे? हा सवाल विचारला आहे.
या व्हिडिओत पुढे म्हटले आहे की यापूर्वी जेव्हा अदानीला कमी गुणवत्तेचा कोळसा महाग विकायचा होता तेव्हा देशभरात केवळ एक-दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा असल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. या गोष्टीचा थेट फायदा अदानीला झाला होता. नरेंद्र मोदी आणि अदानी यावेळीही हेच सूत्र वापरत आहेत का? याचे देशाला उत्तर मिळाले पाहिजे.
दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगोचा गोंधळ आजही सुरू राहिला, पण आज हे संकट काहीसे निवळले. आजही जम्मू, अमृतसर, अहमदाबाद, गुवाहाटी, नागपूर आणि ऐझवाल येथून होणारी 650 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. मात्र, पुणे, संभाजीनगर आणि मुंबई विमानतळावरून इंडिगोचे उड्डाण आज काही प्रमाणात सुरू झाले. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज देशातील विमानतळांवर गर्दीही कमी होती. इंडिगोने असा दावा केला की, आम्ही 95 टक्के विमान वाहतूक सुरळीत केली आहे. आज आम्ही 135 ठिकाणांवरून 1,500 उड्डाणे केली.
केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज पुण्यात पत्रकार परिषदेत इंडिगोच्या गोंधळाबद्दल म्हणाले की, फ्लाईट ड्यूटी टाईम लिमिटेशनच्या नियमांची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, इंडिगोने शेवटपर्यंत याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. 10 तासांच्या कामाचा अवधी 8 तास करण्यात आला. त्यामुळे मनुष्यबळाची अचानक कमतरता निर्माण झाली. परिणामी इंडिगोच्या उड्डाणावर अचानक ताण वाढल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे सरकारला याची गंभीर दखल घेत तत्काळ काही आदेश द्यावे लागले. आता ‘फ्लाईट ड्युटी, टाईम लिमिटेशन’ नियमांना फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए)कडून इंडिगोच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डीजीसीएने चार सदस्यांची समिती नेमली आहे. चार सदस्यांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितले होते की, हा अतिशय बेजबाबदारपणा आहे. समितीने चौकशी केल्यानंतर जी काही माहिती समोर येईल, त्यानुसार कारवाई होईल. इतर विमान कंपन्यांनी वाढविलेले दर कमी करण्यास आम्ही सांगितले आहे. शिवाय भरपाई देण्यास लगेच सुरुवात करावी, असेही निर्देश दिले आहेत.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा
बंगालपाठोपाठच हैदराबादमध्येही उभारणार बाबरी स्मारक
नाशिकसाठी महाजनांची झाडे खरेदी; झाड खरेदीसाठी गिरीश महाजन पोहोचले राजमुद्रीत









