Eknath Chitnis: भारताच्या अंतराळ संशोधनाचा पाया रचणाऱ्या आणि डॉ. विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) यांचे निकटचे सहकारी पद्मभूषण डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे बुधवारी (22 ऑक्टोबर) सकाळी पुण्यात वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले.
यंदा जुलै महिन्यात त्यांनी आपले शतकमहोत्सवी वर्ष साजरे केले होते. त्यांच्या निधनाने भारतीय अवकाश संशोधनाच्या सुवर्ण इतिहासातील एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड गेले आहे.
डॉ. चिटणीस यांचे योगदान
डॉ. चिटणीस यांचा जन्म 25 जुलै 1925 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे शालेय आणि उच्च शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (MIT) अभ्यास केला.
- अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी: फेब्रुवारी 1962 मध्ये अहमदाबाद येथे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. साराभाई आणि डॉ. चिटणीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी झाली. यानंतर 13 फेब्रुवारी 1962 रोजी भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची (INCOSPAR) स्थापना करण्यात आली, ज्यात त्यांचे मोठे योगदान होते.
- प्रक्षेपण केंद्राची निवड: केरळमधील थुम्बा आणि श्रीहरीकोटा (Sriharikota) येथील अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची जागा निवडण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. 1963 मध्ये थुंबा येथून भारताच्या पहिल्या Nike Apache रॉकेटच्या उड्डाणाने त्यांचे स्वप्न साकार झाले.
- शिक्षण आणि टीव्ही क्रांती: त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे 1975-76 मधील सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट (SITE) हा नासा (NASA) आणि इस्रोचा (ISRO) संयुक्त प्रकल्प. या प्रयोगाद्वारे सहा राज्यांतील 2,400 गावांपर्यंत शैक्षणिक कार्यक्रम पोहोचविण्यात आला. याच प्रयोगातून भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली (INSAT) चा पाया रचला गेला आणि देशाच्या खेडोपाडी टीव्ही पोहोचले.
अब्दुल कलाम यांचे मार्गदर्शक
डॉ. चिटणीस यांनी 1981-85 दरम्यान अहमदाबाद येथील इस्रोच्या अंतराळ अनुप्रयोग केंद्राचे (Space Applications Centre) दुसरे संचालक म्हणून काम केले. याच काळात त्यांनी तत्कालीन उदयोन्मुख अभियंता डॉ. एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांना मार्गदर्शन केले.
1962 मध्ये नासा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तरुण कलाम यांची निवड व्हावी यासाठी डॉ. चिटणीस यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा अभ्यास करून विक्रम साराभाईंकडे वैयक्तिकरित्या शिफारस केली होती. पुढे डॉ. कलाम यांनी अंतराळ संशोधन कार्यक्रमात मोठे योगदान दिले आणि त्यांना पहिल्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे (SLV) प्रकल्प संचालकपद मिळाले.
डॉ. चिटणीस यांना 1985 मध्ये पद्मभूषण सन्मान मिळाला. ते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे (PTI) अध्यक्ष आणि 20 हून अधिक वर्षे स्वतंत्र संचालकही होते. निवृत्तीनंतर त्यांनी 25 वर्षे पुणे विद्यापीठात अध्यापन केले. त्यांचे पुत्र डॉ. चेतन चिटणीस यांनाही यंदा पद्मश्री मिळाल्याने एका दुर्मीळ पिता-पुत्र सन्मानाची परंपरा या निमित्ताने झाली.
हे देखील वाचा – Mehul Choksi: फरार मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणणार; मुंबईतील ‘या’ जेलमध्ये ठेवणार, पाहा फोटो