Ladki Bahin Yojana Fraud: जळगाव शहरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कामाचे निमित्त साधून एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता म्हणवणाऱ्या गोकुळ रमेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांची आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या प्रवृत्तीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
जळगाव शहरातील एका 35 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पीडितेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 चे योजनेचे पैसे तांत्रिक कारणास्तव रखडले होते. हे पैसे मिळवण्यासाठी ‘केवायसी’ (KYC) करणे आवश्यक होते. पीडितेच्या पतीने आपले ओळखीचे असलेले गोकुळ चव्हाण यांना हे काम करण्यास सांगितले होते.
- धक्कादायक मागणी: 25 जानेवारी 2026 रोजी गोकुळ चव्हाण कागदपत्रे घेण्यासाठी पीडितेच्या घरी गेला. तिथे त्याने “योजनेचे काम करून देतो, पण त्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवावे लागतील” अशी मागणी केली. हा प्रकार कोणालाही सांगू नको, अशी धमकीही त्याने दिली.
- पाठलाग आणि छेडछाड: पीडितेने घडलेला प्रकार पतीला सांगितल्यावर त्यांनी आरोपीला तंबी दिली होती. मात्र, तरीही आरोपीचा धीटपणा कमी झाला नाही. तो वारंवार महिलेच्या घरासमोर येऊन उभा राहणे आणि तिचा पाठलाग करणे असे प्रकार करू लागला. या त्रासाला कंटाळून अखेर 8 एप्रिल रोजी महिलेने पोलीस ठाणे गाठले.
इतर महिलांनाही टार्गेट केल्याचा आरोप
तक्रारीनुसार, गोकुळ चव्हाण याने केवळ याच महिलेला नाही, तर परिसरातील एका दुसऱ्या वृद्ध महिलेलाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. “तुमचे बंद झालेले निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो” असे आमिष दाखवून त्याने त्या महिलेकडेही प्रेमसंबंधाची मागणी केली होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कोण आहे आरोपी गोकुळ चव्हाण?
गोकुळ चव्हाण हा जळगाव शहरात सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत होता. त्याचे शहरात एक ‘ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र’ आहे. सरकारी योजनांचे फॉर्म भरणे आणि ऑनलाईन कामे करण्याच्या बहाण्याने तो महिलांशी संपर्क वाढवायचा आणि नंतर त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करायचा. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
या प्रकरणावरून रोहिणी खडसे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. लाडक्या बहिणींच्या नावाने योजना काढणाऱ्या सरकारने अशा नराधमांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.










