Jayant Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरली असतानाच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना खुलासा केला की, शरद पवार यांच्या हयातीतच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आणण्यासाठी अजित पवार अत्यंत आग्रही होते. गेल्या सहा महिन्यांपासून या विलीनीकरणासाठी पडद्यामागे अनेक बैठका आणि सविस्तर चर्चा सुरू होत्या.
जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित पवार गेल्या काही महिन्यांत आठ ते दहा वेळा त्यांच्या घरी आले होते. “अजित दादा अनेकदा संध्याकाळी माझ्या घरी यायचे, आम्ही सोबत जेवण करायचो आणि तासनतास पक्षाच्या भवितव्यावर चर्चा व्हायची. साहेबांसोबत (शरद पवार) जे काही मतभेद झाले, ते सर्व विसरून पुन्हा एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस उभी करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांच्या मनात साहेबांविषयी प्रचंड आदर होता आणि जनमानसातील आपली प्रतिमा सुधारण्यासाठी ते पुन्हा मूळ पक्षात येण्यास तयार होते,” असे पाटील यांनी नमूद केले. या प्रक्रियेत सुप्रिया सुळे यांचाही सहभाग होता आणि १२ फेब्रुवारी ही तारीख विलीनीकरणाची घोषणा करण्यासाठी निश्चित करण्यात आली होती.
विमान अपघातापूर्वीची ‘ती’ शेवटची भेट-
विलीनीकरणाच्या प्रक्रियेतील शेवटची निर्णायक बैठक १६ तारखेला जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झाली होती. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढवण्याचा आणि त्यानंतर विलीनीकरणाचा निर्णय जाहीर करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. जयंत पाटील यांनी आठवण सांगितली की, “आम्ही ठरवले होते की पहाटे शरद पवारांची भेट घ्यायची. आम्ही जेव्हा दादांना फोन केला, तेव्हा त्यांनी बारामतीची धावपट्टी लहान असल्याचे सांगून विमानाने येण्यास नकार दिला होता. अखेर आम्ही रस्तेमार्गे पहाटे निघून सकाळी ८ वाजता साहेबांसमोर बसलो. तिथे १२ फेब्रुवारीवर अंतिम मोहर उमटवण्यात आली. मात्र, नियतीने घात केला आणि ही घोषणा होण्यापूर्वीच दादांचे निधन झाले.”
सुनेत्रा पवारांचा शपथविधी आणि प्रफुल्ल पटेल-
तटकरे यांचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर भाष्य करताना जयंत पाटील यांनी हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले. “अजित पवार यांच्या पक्षाचे सध्याचे सर्व निर्णय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ घेत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच हा शपथविधी होत आहे. आमचा मार्ग सध्या वेगळा असल्याने त्यांच्या अंतर्गत निर्णयांवर आम्ही अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही,” असे त्यांनी सुचित केले. मात्र, अजित दादांनी आपल्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला होता की, ते सांगतील तो निर्णय सर्वजण मान्य करतील.
जयंत पाटील यांनी अत्यंत भावूक होत सांगितले की, “अजित पवार जर मुख्यमंत्री झाले असते, तर त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा चेहरामोहरा बदलला असता. कामाची अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंडा होता. नियती किती क्रूर असू शकते, याची प्रचीती या घटनेवरून येते.” शेवटी त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “मी ज्या नेतृत्वाशी चर्चा करत होतो, ते आता आपल्यात नाही. परंतु, अजित दादांचे शेवटचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांच्या पक्षातील निर्णयाची क्षमता असलेल्या नेत्यांवर आहे. त्यांनी दादांची ही इच्छा पूर्ण करून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी.”












