Jaykumar Gore Statement : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते विविध आश्वासने देत आहेत. या प्रचारात भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
सोलापूर आणि कुर्डुवाडी येथील प्रचारसभांमध्ये बोलताना गोरे यांनी महिला मतदारांना थेट आवाहन केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘देवाभाऊ’ असा करत, महिलांना मिळालेल्या सन्मानासाठी भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
योजनेचा दाखला देत भावनिक आवाहन
मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा संदर्भ देत महिलांना आठवण करून दिली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना कुठल्याही जाती-पातीच्या पलीकडे जाऊन आमच्या बहिणींसाठी सुरू केली. आपला ‘देवाभाऊ’ दर महिन्याला खात्यात 1,500 रुपये पाठवतो. या दीड हजार रुपयांशी महिलांनी प्रामाणिक राहिले पाहिजे आणि भावाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सख्ख्या भावाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “राखी पौर्णिमेला सख्खा भाऊसुद्धा बहिणीला 100 रुपये देताना बायकोकडे पाहतो. बायकोची संमती मिळाल्यावरच तो ताटात पैसे ठेवतो, अन्यथा परत खिशात टाकतो. साडीचा विषय तर आता राहिलाच नाही. अशा परिस्थितीत ‘देवाभाऊ’ 1,500 रुपये थेट आपल्या खात्यात टाकत आहेत, याची इमानदारी तुम्ही ठेवा.”
महिलांच्या सन्मानाचा मुद्दा
गोरे यांनी असा दावा केला की, महिलांना स्वाभिमान आणि सन्मान भाजप सरकारने दिला. “पूर्वी महिलांना 100 रुपयांसाठी नवऱ्याकडे किंवा घरातल्या लोकांकडे हात पसरावे लागत होते. पण आज खात्यात पैसे थेट जमा होतात. पूर्वी हात पसरणाऱ्या बहिणीला आज तिचा नवरा विचारतो, तुझ्या खात्यात काही शिल्लक आहेत का? हा सन्मान भाजप आणि ‘देवाभाऊ’ यांनी दिला आहे. अशा भावाला विसरू नका,” असे आवाहन गोरे यांनी केले.
जयकुमार गोरे म्हणाले, “निवडणुकीत जर कोणी पैसे वाटत असेल, तर ते अवश्य घ्या. विरोधी पक्षांच्या घरात आणि बंगल्यात पैसे आले आहेत, पण ते कुणाचे बापाचे नसून आपलेच कमिशनमधून कमावलेले पैसे आहेत. त्यामुळे पैसा कुणाचाही घ्या, पण मतदान करताना ‘देवाभाऊ’ने दिलेले 1,500 रुपये लक्षात घ्या. तुमचा स्वतःचा नवरा तुम्हाला 100 रुपयेही देत नव्हता, हे विसरू नका.”
हे देखील वाचा – Financial Changes: 1 डिसेंबर पासून 10 मोठे बदल! तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे नवे नियम









