Jitendra Awhad on Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर आता या अपघाताभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले आहे. २८ जानेवारी रोजी बारामती येथे निवडणूक प्रचारासाठी जात असताना झालेल्या विमान अपघातात अजितदादांसह पाच जणांचा अंत झाला. मात्र, या प्रकरणातील तांत्रिक पुराव्यांबाबत समोर येणाऱ्या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘ब्लॅक बॉक्स’ जळाल्याच्या वृत्तावर तीव्र आक्षेप नोंदवत तपास यंत्रणांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ब्लॅक बॉक्सच्या तांत्रिक क्षमतेवर प्रश्न-
जितेंद्र आव्हाड यांनी विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ जळाल्याच्या माहितीवर आश्चर्य व्यक्त करताना वैज्ञानिक तर्क मांडले आहेत. “ब्लॅक बॉक्स हा अत्यंत कणखर अशा ‘टायटॅनियम’ धातूपासून बनवलेला असतो. तो साधारणतः ११,००० अंश सेल्सिअस तापमानातील आग सोसण्यास सक्षम असतो. जगात कुठेही विमान अपघात झाला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो, हा आजवरचा इतिहास आहे. असे असतानाही तपास यंत्रणांनी तो जळून खाक झाल्याचे सांगणे अनाकलनीय आहे,” असे आव्हाड यांनी म्हटले. ज्या भागात हा बॉक्स ठेवला जातो, तो विमानाचा भाग अपघातानंतरही सुस्थितीत असताना केवळ बॉक्स कसा जळू शकतो, असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांच्या ‘घातपाता’च्या संशयाला बळ-
यापूर्वी आमदार रोहित पवार यांनीही या अपघातामागे घातपात असण्याची शक्यता वर्तवली होती. विमानामध्ये गरजेपेक्षा जास्त इंधन भरले असणे आणि वैमानिक सुमित कपूर यांनी विमान जाणीवपूर्वक जमिनीवर आदळले असावे, असे संशयास्पद मुद्दे त्यांनी पत्रकार परिषदेत मांडले होते. जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला असून, या संशयास्पद बाबींमध्ये निश्चितच तथ्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
तपास यंत्रणांच्या भूमिकेवर टीका-
तपास प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावर भाष्य करताना आव्हाड म्हणाले की, “जितका चौकशीला उशीर केला जाईल आणि जेवढ्या विसंगत गोष्टी सांगितल्या जातील, तितका लोकांच्या मनातील संशय बळावत जाईल. शंकेला वाव मिळणे हे लोकशाहीत नैसर्गिक आहे, परंतु तपास यंत्रणांनी सत्य समोर आणणे गरजेचे आहे.” ब्लॅक बॉक्स हा अपघाताचे गूढ उकलणारा सर्वात महत्त्वाचा दुवा असतो, तोच नष्ट झाल्याचे सांगणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.











