K Annamalai : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून आता हा वाद महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू असा रंगताना दिसत आहे. ‘मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही’ असे विधान केल्याने तामिळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी आता राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. आपल्यावर टीका करणाऱ्यांना ‘मूर्ख’ संबोधत त्यांनी मुंबईत येणार असल्याचे थेट आव्हान दिले आहे.
“धमक्यांना घाबरत नाही, मुंबईत येणारच”
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून झालेल्या टीकेला आणि राज ठाकरेंनी सभेमध्ये घेतलेल्या समाचाराला अण्णामलाई यांनी तामिळ माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. ते म्हणाले, “माझ्यावर टीका करणाऱ्यांना मूलभूत समज नाही. सामनामध्ये लिहिले आहे की, मी मुंबईत आलो तर माझे पाय तोडले जातील. मी अशा धमक्यांना घाबरणारा माणूस नाही. मी मुंबईत येणार आहे, तुम्हाला जे करायचे आहे ते करून दाखवा. जर मी अशा दहशतीला घाबरलो असतो, तर मला माझ्या गावी घरातच बसून राहावे लागले असते.”
विवादास्पद विधानावर अण्णामलाईंचे स्पष्टीकरण
मुंबईबाबत केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचा दावा अण्णामलाई यांनी केला. त्यांनी स्पष्ट केले की, “जेव्हा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताचे नेते म्हणतो, तेव्हा ते ‘गुजराती’ राहत नाहीत असा त्याचा अर्थ होतो का? किंवा कामराज यांना भारताचे महान नेते म्हटल्यावर ते तामिळ राहत नाहीत का? त्याचप्रमाणे, मी जेव्हा मुंबईला जगाची राजधानी किंवा आंतरराष्ट्रीय शहर म्हणतो, तेव्हा ते मराठी बांधवांच्या कष्टाने उभे राहिले नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. माझ्यावर टीका करणारे लोक फक्त त्यांच्या वडिलांच्या वारशाचे नुकसान करत आहेत.”
ठाकरेंवर बोचरी टीका
राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे सध्या रिकामे असून त्यांच्याकडे कोणतेही ठोस काम नसल्यामुळे ते इकडे-तिकडे फिरत असल्याची टीका अण्णामलाई यांनी केली. ते पुढे म्हणाले की, “जर आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर या लोकांसाठी राजकारणात कोणतीही जागा राहिली नसती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला प्रचंड आदर असून माझ्या कार्यालयात त्यांचे छायाचित्र मी अभिमानाने लावले आहे.”
दरम्यान, २० वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी अण्णामलाईंच्या विधानाचा मुद्दा पकडून भाजपला घेरले होते. राज ठाकरेंनी अण्णामलाईंचा उल्लेख ‘रसमलाई’ असा करत त्यांच्यावर सडकून टीका केली होती. आता अण्णामलाई यांनी दिलेल्या या खुल्या आव्हानामुळे मुंबईतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.









