BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या विजयामुळे महायुतीचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच, भाजप नेते के. अण्णामलाई यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी केलेल्या ‘रसमलाई’ टिकेचा समाचार घेत, अण्णामलाई यांनी मुंबईच्या मतदारांचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले अण्णामलाई?
भाजपच्या दणदणीत विजयानंतर अण्णामलाई यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “मुंबईच्या जनतेने अतिशय स्पष्ट कौल दिला आहे. महायुतीचा हा ऐतिहासिक विजय म्हणजे केवळ विकासाच्या राजकारणावर उमटवलेली मोहोर आहे. विरोधकांनी मुंबईकरांना भाषिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरून विभागण्याचा प्रयत्न केला, जो विसाव्या शतकातील जुनाट विचार होता. मात्र, जनतेने हे फुटीरतावादी राजकारण पूर्णपणे नाकारले आहे.”
त्यांनी पुढे नमूद केले की, “जेव्हा आम्ही पायाभूत सुविधा, नोकऱ्या आणि प्रगतीबद्दल बोलत होतो, तेव्हा विरोधक केवळ द्वेष पसरवण्याचे काम करत होते. मुंबईकरांनी आज विभाजनाऐवजी ऐक्य आणि प्रगतीची निवड केली आहे.”
The people of Maharashtra have given a decisive verdict! The Mahayuti alliance’s sweeping success in the local body polls is a powerful mandate for purposeful, performance-driven governance.
— K.Annamalai (@annamalai_k) January 16, 2026
From villages to metro cities, people’s trust in the triple-engine leadership stands…
‘रसमलाई’ वादाची पार्श्वभूमी
निवडणुकीच्या प्रचारात अण्णामलाई यांनी मुंबईला ‘आंतरराष्ट्रीय शहर’ म्हटल्याने राज ठाकरे संतापले होते. एका सभेत त्यांनी अण्णामलाई यांचा उल्लेख ‘रसमलाई’ असा केला होता आणि “हटाओ लुंगी, बजाओ पुंगी” अशी घोषणाही दिली होती. यावर अण्णामलाई यांनी “मी मुंबईला येईल, हिंमत असेल तर माझे पाय तोडून दाखवा,” असे आव्हानही दिले होते. आजच्या निकालाने अण्णामलाई यांना राज ठाकरेंना सडेतोड उत्तर देण्याची संधी दिली आहे.
विजयाचे श्रेय आणि ‘ट्रिपल इंजिन’
अण्णामलाई यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिले आहे. “गावखेड्यांपासून ते महानगरांपर्यंत जनतेने दाखवलेला हा विश्वास म्हणजे ‘ट्रिपल इंजिन’ सरकारवरची मोहोर आहे,” असेही त्यांनी म्हटले.









