BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी देशभरातील भाजप नेत्यांनी मुंबईत हजेरी लावली आहे. मात्र, तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे भाजपची अडचण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना अण्णामलाई यांनी “मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही,” असे विधान केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी भाजपला धारेवर धरले आहे.
नेमके प्रकरण काय?
मुंबईतील प्रभाग क्रमांक 47 मध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी अण्णामलाई आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “केंद्रात नरेंद्र मोदी आहेत, राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत आणि आता मुंबईत भाजपचा महापौर हवा आहे. कारण मुंबई हे केवळ महाराष्ट्राचे शहर नसून ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे.”
त्यांनी मुंबईच्या 75,000 कोटी रुपयांच्या बजेटची तुलना चेन्नई (8,000 कोटी) आणि बंगळुरू (19,000 कोटी) यांच्याशी केली. मुंबईचे इतके मोठे बजेट हाताळण्यासाठी प्रशासनात सक्षम आणि भाजपचे लोक बसवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संजय राऊत यांचा आक्रमक पवित्रा
अण्णामलाई यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. राऊत म्हणाले की, “हे विधान १०६ हुतात्म्यांचा अपमान आहे. अण्णामलाईवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. भाजपचा हा स्टार प्रचारक मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या थोबाडीत मारून गेला आहे. आता भाजपचे नेते कुठे तोंड लपवणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच अण्णामलाई यांना महाराष्ट्राबाहेर जाऊ देऊ नका, अशी मागणीही त्यांनी केली.
विरोधकांकडून टीकेची झोड
केवळ संजय राऊतच नव्हे, तर सुप्रिया सुळे यांनीही या विधानाचा निषेध केला आहे. “मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि राहील,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. दुसरीकडे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आधीच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप प्रचारात केला आहे. अण्णामलाई यांच्या विधानामुळे विरोधकांच्या या आरोपांना आता अधिक बळ मिळाले आहे.
भाजपची कोंडी आणि शिंदेंची ग्वाही
या वादामुळे भाजपचे स्थानिक नेते बॅकफूटवर गेले असून त्यांनी अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही वेगळी करू शकणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी “चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील,” असे म्हटले होते.









