कोल्हापूरची ‘महादेवी’ हत्तीण ‘वनतारा’मधून परत येऊ शकते का? जाणून घ्या

Elephant Mahadevi News

Elephant Mahadevi News : कोल्हापूरमधील (Kolhapur) 36 वर्षीय ‘महादेवी’ (Mahadevi) या हत्तीणीला गुजरातच्या जामनगर येथील ‘वनतारा’ (Vantara) येथे हलवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. माजी खासदार राजू शेट्टी आणि कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील ग्रामस्थ हत्तीणीला (Elephant Mahadevi News) परत आणण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या एका बैठकीनंतर आबिटकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. “बैठकीत वनताराच्या अधिकाऱ्यांनी महादेवीला नांदणीमध्ये परत आणण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे,” असे ते म्हणाले.

यासोबतच भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेना खासदार धैर्यशील माने हे दोघेही महादेवीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी केंद्र सरकारसोबत काम करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

गावकरी संतापले, ‘जिओ’वर बहिष्कार

हत्तीणीला हलवल्यामुळे नांदणी गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आहे. कोल्हापूरमधील अनेक भागात ‘बॉयकॉट जिओ’ (Boycott Jio) मोहीम सुरू केली आहे. 10,000 पेक्षा जास्त लोकांनी जिओचे सिम कार्ड पोर्ट केल्याचे वृत्त आहे.

‘वनतारा’ने दिले स्पष्टीकरण

मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘वनतारा’ने या वादावर सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले आहे. वनताराने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, हत्तीणीला हलवण्याची प्रक्रिया त्यांनी स्वतःहून सुरू केली नव्हती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच त्यांनी हे काम केले. या आदेशाचे नंतर सर्वोच्च न्यायालयानेही समर्थन केले होते. त्यामुळे, वनताराने केवळ न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महादेवीच्या आरोग्याला आणि कल्याणाला प्राधान्य देणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे, असेही वनताराने सांगितले. अनेक वर्षांपासून कॉंक्रिटच्या फरशीवर राहिल्यामुळे महादेवीला अनेक शारीरिक समस्या झाल्या होत्या आणि वनताराचे उद्दिष्ट अशा प्राण्यांना योग्य उपचार आणि चांगले वातावरण देणे आहे.

यासोबतच वनताराने कोल्हापूरमधील लोकांच्या महादेवीबद्दल असलेल्या भावनांचा आदर केला आहे. महादेवीची उपस्थिती अनेकांसाठी श्रद्धेचे प्रतीक होती, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच जनतेच्या तीव्र भावना आणि त्यांच्या संतापाची आम्हाला पूर्ण समज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकांच्या भावनांचा आदर करत वनताराने जैन मठाचे स्वामीजी आणि संबंधित व्यक्तींसोबत थेट संवाद सुरू केला आहे. महादेवीच्या भविष्याबद्दल एक शांततापूर्ण आणि समाधानकारक तोडगा काढण्यासाठी कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार सर्व शक्यता तपासल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. यामध्ये महादेवीच्या आरोग्याला आणि समाजाच्या भावनांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रिपोर्टनुसार, योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास महादेवी हत्तीणीला परत देण्याची तयारी वनताराने दर्शवली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वनताराच्या अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिले आहे. मात्र, न्यायालयानेच हत्तीणीला हलवण्याचा आदेश दिल्याने न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल.

पेटाच्या तक्रारीमुळे सुरू झाला वाद

16 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हत्तीणीला गुजरातला हलवण्याच्या पेटा (PETA) संस्थेच्या मागणीनुसार दिलेल्या आदेशाचे समर्थन केले होते. न्यायालयाने म्हटले होते की, हत्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला माणसाच्या धार्मिक भावनांपेक्षा जास्त महत्त्व आहे. न्यायालयाने मागील काही वर्षांच्या अहवालांचा संदर्भ देत, हत्तीणीची स्थिती “अत्यंत वाईट” असल्याचे सांगितले होते.