Kolhapur Municipal Election 2025: कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून महायुतीने अत्यंत सावधपणे आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महायुतीमधील तीनही प्रमुख पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ही निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि भाजप आमदार अमल महाडिक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला रोखण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे.
बंडखोरी रोखण्यासाठी ‘उपसमिती’ची स्थापना
निवडणुकीत उमेदवारीवरून होणारी बंडखोरी टाळण्यासाठी आणि ‘इलेक्टीव्ह मेरीट’ म्हणजेच निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी महायुतीने एक विशेष उपसमिती स्थापन केली आहे.
- शिवसेना: ऋतुराज क्षीरसागर, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख.
- भाजप: आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील.
- राष्ट्रवादी काँग्रेस: आदील फरास, महेश सावंत, संदीप कवाळे.
ही उपसमिती प्रत्येक प्रभागातील सक्षम उमेदवारांची चाचपणी करून आपला अहवाल वरिष्ठ नेत्यांना सादर करेल. त्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक हे वरिष्ठ नेते जागावाटपावर अंतिम निर्णय घेतील.
जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
सध्याच्या चर्चेनुसार, कोल्हापूर मनपाच्या एकूण 81 जागांपैकी भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 33 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. यावर वरिष्ठ पातळीवर लवकरच अंतिम मोहोर उमटवली जाईल. महापालिकेत एकूण 20 वॉर्ड निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी पहिल्या 19 वॉर्डमध्ये प्रत्येकी 4 आणि 20 व्या वॉर्डमध्ये 5 नगरसेवक असतील.
फोडाफोडीचे राजकारण आणि सतेज पाटलांसमोर आव्हान
गेल्या काही दिवसांत काँग्रेसला मोठे धक्के देत शिवसेनेने अनेक माजी नगरसेवकांना आपल्या गोटात सामील करून घेतले आहे. माजी महापौर सई खराडे यांचा पक्षप्रवेश हा त्याचाच एक भाग आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये सतेज पाटील यांच्यावर प्रचाराची धुरा असल्याने कोल्हापूरची ही लढाई अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकवण्यासाठी तिन्ही पक्षांनी यावेळी एकीचे बळ दाखवण्याचा चंग बांधला आहे.
हे देखील वाचा – ED : सोनू सूद, युवराज सिंगसह अनेक सेलिब्रिटींना ईडीचा दणका! कोट्यवधींची मालमत्ता जप्त; काय आहे प्रकरण?








