Home / महाराष्ट्र / Kolhapur News : श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात पुजारी आणि भाविकांमध्ये तुंबळ हाणामारी; ३० जणांवर गुन्हे दाखल, परिते ग्रामस्थ आक्रमक

Kolhapur News : श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात पुजारी आणि भाविकांमध्ये तुंबळ हाणामारी; ३० जणांवर गुन्हे दाखल, परिते ग्रामस्थ आक्रमक

Kolhapur News : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर परिसरात काल भाविक आणि पुजारी यांच्यात झालेल्या हिंसक...

By: Team Navakal
Kolhapur News
Social + WhatsApp CTA

Kolhapur News : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर परिसरात काल भाविक आणि पुजारी यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षाने जिल्हा हादरला आहे. करवीर तालुक्यातील परिते येथील भाविक दर्शनासाठी गेले असता, किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामध्ये १५ ते २० पुजारी दोन भाविकांवर अक्षरशः तुटून पडल्याचे आणि त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत असल्याचे विदारक दृश्य दिसत आहे.

नारळाने प्रहार आणि ‘छबिना’ प्रकरणाचा वाद-
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही पुजारी भाविकांच्या डोक्यात नारळाने प्रहार करताना दिसत आहेत, ज्यामुळे या घटनेची भीषणता अधिकच वाढली आहे. या वादाच्या कारणाबाबत दोन भिन्न प्रवाह समोर येत आहेत. पुजाऱ्यांच्या गटाने असा आरोप केला आहे की, संबंधित भाविकांनी मद्यप्राशन करून मंदिरात हुल्लडबाजी केली आणि देवाच्या ‘छबिना’ सोहळ्यात व्यत्यय आणून छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिते ग्रामस्थांनी हे सर्व आरोप सपशक फेटाळून लावले आहेत. पुजाऱ्यांनीच वादाला सुरुवात करून भाविकांना विनाकारण लक्ष्य केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

परिते गावात निषेध फेरी आणि संतापाची लाट-
या घटनेचे पडसाद परिते गावात तीव्र उमटले आहेत. आपल्या गावातील भाविकांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी गावात मोठी निषेध फेरी काढली. “भक्तीच्या ठिकाणी शक्तीचा असा गैरवापर करणाऱ्या पुजाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी गावचे सरपंच मनोज पाटील यांनी केली आहे. भाविकांनी मद्यप्राशन केल्याचा पुजाऱ्यांचा दावा खोटा असून, ही केवळ मारहाणीचे समर्थन करण्यासाठी रचलेली कथा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोडोली पोलिसांची कारवाई आणि ३० जणांवर गुन्हे-
या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने कोडोली पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या एकूण ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये १५ पुजारी आणि १५ भाविकांचा समावेश आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे दोषींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारची हिंसा घडल्याने सर्वसामान्य भाविकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.

चैत्र यात्रेच्या तोंडावर तणाव-
जोतिबा देवाची प्रसिद्ध चैत्र यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या यात्रेसाठी लाखो भाविक जोतिबा डोंगरावर येत असतात. अशा मोठ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा राडा झाल्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या