Konkan Railway ratnagiri diva passenger : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ‘रत्नागिरी-दिवा पॅसेंजर’ गाडीला पुन्हा एकदा दादरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारणास्तव फेटाळून लावली आहे. कोरोना महामारीच्या काळात बंद झालेली रत्नागिरी-दादर ही सेवा सध्या केवळ दिवा स्थानकापर्यंत मर्यादित आहे. ही सेवा पुन्हा एकदा मुंबईच्या मध्यवर्ती भागातून म्हणजेच दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सुरू व्हावी, यासाठी प्रवाशांचा मोठा दबाव होता. या पार्श्वभूमीवर, मुंबईतील खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी दिल्लीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या मागणीचे पत्र सोपवले. मात्र, रेल्वे विभागाने दादरपर्यंत ही गाडी चालवणे सध्या तरी अशक्य असल्याचे स्पष्ट केल्याने प्रवाशांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.
या भेटीनंतर खासदार रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली माहिती अधिकच खळबळजनक आणि चक्रावून टाकणारी आहे. त्यांच्या दाव्यानुसार, भविष्यात कोकण रेल्वेचा संपूर्ण प्रवास मार्गच बदलण्याची चिन्हे आहेत. सध्याची रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ही आगामी काळात पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकावरून पनवेलमार्गे कोकणात मार्गस्थ होईल. केवळ पॅसेंजरच नव्हे, तर पुढील दीड ते दोन वर्षांत नवीन रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोकणात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्या या नवीन पर्यायी मार्गाने चालवल्या जातील. या बदलामुळे मध्य मुंबईतील प्रवाशांना बोरिवली किंवा पनवेल यांसारख्या स्थानकांचा आधार घ्यावा लागणार आहे.
रेल्वेच्या या प्रस्तावित नवीन आराखड्यानुसार, कोकण रेल्वेच्या गाड्या आता पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरिवली स्थानकातून सुटतील. हा नवा मार्ग बोरिवलीहून निघून जुईचंद्रा, कमान रोड, खारबाव, डुंगे, भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, नांदवली, तळोजे आणि कळंबोलीमार्गे पनवेलला जोडला जाईल. त्यानंतर या गाड्या नियमित कोकण रेल्वेमार्गावर प्रवेश करतील. खासदार वायकर यांनी स्पष्ट केले की, या नवीन मार्गामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक वेगवान आणि सोयीस्कर सेवा मिळेल, त्यामुळे सध्याच्या गैरसोयीवरून राजकारण करू नये. दीड वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे.










