Konkan Railway Holi Special: मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणजेच होळी आणि कोकणात साजरा होणारा ‘शिमगा’ आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवासाठी मुंबई-पुण्यातील हजारो कोकणवासी आपल्या गावी जातात.
प्रवाशांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने कंबर कसली असून, पनवेल ते रत्नागिरी आणि दिवा ते चिपळूण दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल – रत्नागिरी मेमू विशेष सेवा
पनवेल आणि रत्नागिरी दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी 6 विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
- गाडी क्रमांक 01157: ही गाडी 27 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी पनवेलवरून दुपारी 4.40 वाजता सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी रात्री 11.55 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01158: ही गाडी रत्नागिरी येथून सकाळी 9 वाजता सुटेल आणि दुपारी 4.10 वाजता पनवेलला पोहोचेल.
- प्रमुख थांबे: या गाडीला पेण, नागोठणे, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर रोडसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
दिवा – चिपळूण विशेष रेल्वे सेवा
दिवा स्थानकावरून चिपळूणसाठी देखील विशेष मेमू चालवण्यात येणार आहे. ही सेवा 2 मार्च ते 8 मार्च या कालावधीत दररोज उपलब्ध असेल.
- गाडी क्रमांक 01159: दिवा येथून दररोज रात्री 11.25 वाजता ही गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता चिपळूणला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01160: परतीच्या प्रवासात ही गाडी चिपळूणवरून दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि रात्री 11.10 वाजता दिवा येथे पोहोचेल.
- प्रमुख थांबे: तळोजा, कळंबोली, पनवेल, रोहा, माणगाव, वीर आणि खेड यांसारख्या स्थानकांवर या गाडीला थांबे असतील.
या सर्व गाड्या अनारक्षित असून प्रवाशांना स्थानकावर जाऊन तिकीट काढता येणार आहे. या विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून कोकणवासीयांना शिमग्यासाठी गावी जाणे अधिक सोयीचे ठरणार आहे.










