Home / महाराष्ट्र / Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील तक्रारींच्या निराकरणासाठी १८१ हेल्पलाईन कार्यान्वित

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील तक्रारींच्या निराकरणासाठी १८१ हेल्पलाईन कार्यान्वित

Ladki Bahin Yojana : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास विभागाने एक...

By: Team Navakal
Ladki Bahin Yojana
Social + WhatsApp CTA

Ladki Bahin Yojana : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान लाभार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी व तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी १८१ हा स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली आहे.

योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची करण्यात आल्यानंतर अनेक महिलांना मासिक आर्थिक हप्ता मिळण्यात अडथळे येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत होत्या. काही लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असूनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नसणे, तर काही प्रकरणांत ई-केवायसी अपूर्ण असल्याचे दाखवले जाणे, अशा विविध तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी समोर आल्या होत्या. यासोबतच योजनेशी संबंधित इतर शंका, माहितीचा अभाव आणि तांत्रिक त्रुटींमुळे लाभार्थी संभ्रमात पडत असल्याचेही निदर्शनास आले होते.

या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत महिला व बालविकास विभागाने लाभार्थ्यांना थेट संवादाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून अनवधानाने चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे त्यांचा लाभ तात्पुरता स्थगित झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळावे आणि समस्या त्वरित सोडवता याव्यात, यासाठी ही हेल्पलाईन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

१८१ या महिला हेल्पलाईनवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व शंका, तक्रारी आणि अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सेवेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कॉल ऑपरेटरना आवश्यक ते विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, लाभार्थ्यांना अचूक, स्पष्ट आणि तत्पर माहिती देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे तक्रारींचे निरसन अधिक सुलभ, जलद आणि प्रभावीपणे होईल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याविना प्रत्येक पात्र महिलेला मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असून, १८१ हेल्पलाईनमुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या