Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या फेब्रुवारी महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची अधिकृत प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देत कोट्यवधी भगिनींना दिलासा दिला आहे.
तांत्रिक प्रक्रिया पूर्ण; २ ते ३ दिवसांत खात्यात जमा होणार १५०० रुपये-
मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न (Aadhaar Linked) बँक खात्यात वर्ग करण्याची तांत्रिक प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. आजपासून निधी वितरणास सुरुवात झाली असून, पुढील ४८ ते ७२ तासांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम प्रत्यक्ष जमा होईल. ज्या महिलांची ‘ई-केवायसी’ (e-KYC) प्रक्रिया पूर्ण आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले आहे, त्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणीविना हा लाभ प्राप्त होणार आहे.
काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे?
या निर्णयाबाबत सोशल मीडियाद्वारे आपली भावना व्यक्त करताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सक्षमपणे राबवली जात आहे. राज्यातील लाडक्या बहिणींचा सरकारवर असलेला विश्वासच या योजनेच्या यशस्वी वाटचालीचे मुख्य बळ आहे.”
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
राज्यातील महिलांना सन्मानाने जगता यावे आणि त्यांना छोटेखानी गरजांसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, या उदात्त हेतूने दरमहा १५०० रुपयांचा हा सन्मान निधी दिला जातो. फेब्रुवारी महिन्याचा निधी कधी मिळणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून महिलांमध्ये मोठी उत्सुकता आणि चर्चा होती. आता प्रत्यक्ष निधी वाटप सुरू झाल्याने ग्रामीण व शहरी भागातील महिला वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना: ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत अखेरची संधी-
राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत असलेल्या महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. ज्या पात्र महिलांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना काही तांत्रिक चुका केल्या होत्या, त्यांना आता ही माहिती दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी आता केवळ काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून, लाभार्थ्यांनी तातडीने आपली माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पात्रतेचे निकष आणि ई-केवायसीचे महत्त्व
राज्य सरकारने ही योजना कार्यान्वित करताना अत्यंत स्पष्ट निकष निश्चित केले होते. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशाच कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने पात्र भगिनींच्या खात्यात पोहोचवण्यासाठी सरकारने विविध विभागांकडून माहिती संकलित केली होती. त्यानंतर, प्रत्येक लाभार्थी महिलेला आपली ओळख पटवण्यासाठी आणि बँक खाते प्रमाणित करण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते.
चुकीच्या माहितीमुळे निधी रखडण्याची शक्यता
ई-केवायसीची प्रक्रिया ही मोबाईल संच किंवा संगणकाद्वारे पूर्ण करायची होती. मात्र, ही तांत्रिक प्रक्रिया पार पाडताना अनेक महिलांकडून अनावधानाने चुकीचे पर्याय निवडले गेले किंवा माहिती भरताना त्रुटी राहिल्याचे निदर्शनास आले आहे. अशा तांत्रिक चुकांमुळे अनेक पात्र महिलांचा मासिक सन्मान निधी रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने संवेदनाशिलता दाखवत, अशा महिलांना आपली माहिती सुधारण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ दिली होती.
अंतिम ६ दिवस शिल्लक; तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन
आता या मुदतीचे केवळ शेवटचे सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव प्रलंबित आहेत किंवा ज्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांनी आपल्या नजीकच्या सेतू केंद्रावर किंवा स्वतःच्या मोबाईलवरून ई-केवायसीमधील चुका दुरुस्त करणे आवश्यक आहे. ३१ मार्चनंतर ही सुविधा बंद होऊ शकते, ज्यामुळे पुढील महिन्यांचे हप्ते मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.












