Ladki Bahin Yojana : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत ई-केवायसी (e-KYC) दुरुस्तीसाठी असलेली ३१ मार्चची मुदत आता ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील पात्र महिलांना तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी ही शेवटची संधी असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, ज्याचा लाभ घेण्यापासून कोणतीही बहीण वंचित राहू नये, असा सरकारचा मानस आहे.
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बोलताना आदिती तटकरे यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. खरात प्रकरणावर केली जाणारी राजकारणप्रेरित टीका अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, त्यांनी या प्रकरणातील पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. “हे प्रकरण समोर आल्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी मी एक होते,” असे नमूद करत त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली असून त्याचे नेतृत्व एका अनुभवी महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवले आहे. दोषींना कठोरतम शिक्षा व्हावी आणि पीडित महिलांना न्याय मिळावा, हीच सरकारची आणि माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
पक्षांतर्गत विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करताना आदिती तटकरे यांनी ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या विधानाचा संदर्भ दिला. ‘दादा’ असतानाचे आणि ‘दादां’ पश्चातचे विलीनीकरण या दोन भिन्न बाबी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पक्षाच्या नेतृत्वाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर बोलताना त्या म्हणाल्या की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा ज्या पद्धतीने संघटितपणे झाली, तशी परिस्थिती अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात दिसून आली नाही. आदरणीय सुनेत्राकाकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष करावे किंवा त्यांच्या नेतृत्वात सर्वांनी काम करावे, अशी अधिकृत भूमिका कोणीही मांडली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.










