मुंबई- लालबाग राजा (Lalbaug Raja) गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी ५० फूट उंच वातानुकुलीत मंडप उभारण्यात येणार आहे. मात्र यावर आक्षेप घेतला जात आहे . या मंडपाची सुरक्षा, त्याचा पर्यावरणावर होणार परिणाम, त्यात लावली जाणारी वातानुकूलित यंत्रणा (AC), गर्दी व वाहतूकीचे नियोजन कसे केले जाणार आहे ? त्यासाठी परवानग्या घेतल्या आहेत का ? या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी काय उपाययोजना करण्यात आली आहे असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या एक्स (X) अकाऊंटवर म्हटले आहे की, मंडळाने सर्व भाविकांना हे अवगत करावे की त्यांनी सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत. अग्निशमन दल(Fire brigade), वाहतूक पोलीस यांच्या परवानग्या घेतल्याची माहितीही समाजमाध्यमावर (Social media) प्रकाशित करावी. या मंडपाची उंची चार मजली इमारती इतकी आहे. या ठिकाणी दहा दिवस अखंड भंडारा चालणार असून भाविकांना ३० लाख लाडूंचेही वाटप करण्यात येणार आहेत. यासाठी अन्न प्रशासनाची परवानगी घेतली आहे का ?
लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाचे हे ९२ वर्ष आहे. त्या निमित्ताने भाविकांसाठी हा भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. या मंडपाचा, त्याच्या सजावटीचा व त्यातील भंडाऱ्याचा सर्व खर्च रिलायन्सचे (Reliance Industries) अनंत अंबानी (Anant Ambani) उचलणार आहेत. गेल्या वर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला एक कोटीहून अधिक भाविक आले होते. याहीवर्षी त्याहूनही अधिक भाविक दर्शनाला येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.