मुंबई-मुंबईचा प्रसिद्ध लालबाग राजा गणेशाच्या विसर्जनात यंदा प्रथमच मोठी अडचण आल्याने दरवर्षी सकाळी नऊ वाजेपर्यंत होणारे विसर्जन यावेळी रात्री झाले. बाप्पाचे आगमन गिरगाव चौपाटीवर दीड तास उशिराने झाले, तोपर्यंत समुद्राला भरती आल्याने मूर्तीचे पाट तराफ्यावर नेणे अशक्य झाले. यावर्षी आधुनिक स्वयंचलित तराफा आणूनही अडचण झाली, परिणामी दुपारी 4 वाजता ओहोटी येईपर्यंत वाट पाहावी लागली आणि रात्री उशीरा विसर्जन शक्य झाले. या काळात कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड धाकधूक निर्माण झाली. शेजारच्या गणेशगल्ली मंडळाचे व इतर कार्यकर्ते मदतीला धावले. बाप्पा मात्र पावला आणि रात्री उशीरा का होईना विसर्जन झाले.
काल दुपारी 12 वाजता लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक नेहमीप्रमाणे सुरू झाली. वाजतगाजत लालबाग राजा गिरगाव चौपाटीला येतो. पूर्वी सकाळी 7 वाजता राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीला पोहोचायची. त्यानंतर तराफ्याच्या साहाय्याने खोल समुद्रात मूर्ती नेऊन सकाळी 9 वाजेपर्यंत विसर्जन पूर्ण होत असे. यंदा मात्र लालबाग राजाची मिरवणूक अधिक काळ सुरू राहिल्याने गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचण्यासच सकाळचे साडेआठ वाजले होते. समुद्रात भरती केव्हा येते याची वेळ आधीच माहीत असते. याप्रमाणे आज 9.14 वाजता समुद्राला भरती येणार होती. मिरवणूक उशिरा पोहचल्याने राजाची मूर्ती तराफ्यावर नेण्यास विलंब झाला. तोपर्यंत समुद्राला भरती आली होती. लाटा उसळत होत्या. परिणामी तराफा हलू लागला आणि मूर्ती तराफ्यावर चढविता येईना. यामुळे मूर्ती तशीच समुद्रात ठेवावी लागली. ओहोटी येण्याची वाट बघण्यापलिकडे दुसरा पर्याय राहिला नव्हता.
यंदा लालबाग राजासाठी आधुनिक, स्वयंचलित आणि आकाराने मोठा असा तराफा आणण्यात आला होता. हा तराफा समुद्रात नेण्यासाठी कोळी बांधवांच्या बोटींची आवश्यकता भासणार नव्हती. मात्र मिरवणूक चौपाटीवर उशिरा पोहचल्याने मूर्ती तराफ्यावर वेळेत हलविता आली नाही. दुपारी 1 वाजेपर्यंत मूर्ती तशीच ठेवण्यात आली. त्यानंतर पाणी काहीसे ओसरल्याने मूर्ती तराफ्यावर आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोही अयशस्वी ठरला. या सर्व परिस्थितीमुळे लालबाग राजाचे कार्यकर्ते प्रचंड तणावात आले होते. लालबाग राजाच्या शेजारी गणेशगल्ली गणेशोत्सव मंडळ यांचे कार्यकर्ते व इतरही गणेशभक्त मदतीला धावून आले. दुपारी 4.30 वाजता समुद्राला ओहोटी आली. समुद्राचे पाणी पूर्ण मागे हटले. त्यानंतर तातडीने लालबाग राजाची मूर्ती तराफ्यावर आणण्यात आली. ही मोहीम यशस्वी ठरली. मात्र त्यानंतर तराफा समुद्रात खोल नेण्यासाठी समुद्राला पुन्हा भरती येण्याची वाट पाहावी लागली.
रात्री आठ वाजता लालबागच्या राजाची निरोपाची आरती घेण्यात आली. त्यानंतर साडेआठ वाजता भरतीचे पाणी थोडे वाढल्यावर तराफ्याला धक्का मारत समुद्रात ढकलण्यात आले. त्यानंतर विसर्जन करण्यासाठी तयार असलेल्या बोटींनी हळूहळू तराफ्याला खोल समुद्राच्या दिशेने खेचायला सुरुवात केली. त्यावेळी किनाऱ्यावर उभ्या असलेल्या शेकडो भक्तांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार केला. यावेळी बोटींतून फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. उद्योगपती अनंत अंबानीदेखील यावेळी तराफ्यावर उपस्थित होते. अखेर गिरगाव चौपाटीवरील बारा तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाचे खोल समुद्रात विसर्जन झाले. लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाच इतका प्रचंड विलंब झाला. मिरवणुकीला झालेला विलंब, समुद्राला आलेली भरती आणि ओहोटी या सर्वामुळे हे संकट ओढवले होते. मात्र बाप्पाने गणेशभक्तांवर प्रसन्न राहून विलंबाने का होईना कोणतेही आणखी विघ्न येऊ न देता विसर्जन सुरळीत पार पाडण्याचा आशीर्वाद दिला.
फक्त 15 मिनिटे उशीर झाला!
लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले की, लालबागच्या राजाची मिरवणूक 22-24 तास चालली. आम्हाला यायला 10-15 मिनिटे उशीर झाला. तेवढ्यात भरती आली. यंदा भरती खूप लवकर आली. राजाचा विसर्जन सोहळा हा पूर्णपणे भरती-ओहोटीवर अवलंबून असतो. भरती आल्यानंतरही आम्ही मूर्ती तराफ्यावर नेण्याचा काहीसा प्रयत्न केला. पण नंतर तो रद्द केला. ओहोटी आल्यानंतर पुन्हा मूर्ती तराफ्यावर चढवली. आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा वेगळ्या पद्धतीचा क्षण आहे. आम्ही नियोजन करतो आणि होत नाही, असे घडत नाही. त्यामुळेच मी दिलगिरी व्यक्त करतो.