Latur Municipal Election: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, लातूरमध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या सत्तेची चावी अखेर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीकडे आली आहे. या निवडणुकीत प्रस्थापित भाजपला बाजूला सारत काँग्रेसने स्पष्ट बहुमताच्या दिशेने झेप घेतली असून, शहरात आता काँग्रेसचा महापौर विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
गुरुवारी १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या मतदानात लातूरमध्ये सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. ७० जागांसाठी झालेल्या या रणधुमाळीत ३६९ उमेदवार नशीब आजमावत होते.
पक्षनिहाय जागा (एकूण जागा ७०)
विजयासाठी आवश्यक बहुमताचा आकडा ३६ असताना, काँग्रेस युतीने ३७ जागा जिंकून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे.
| पक्ष | मिळालेल्या जागा |
| काँग्रेस | 32 |
| वंचित बहुजन आघाडी | 05 |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | 14 |
| इतर (राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम इ.) | मोजणी सुरू/इतर |
काँग्रेस-वंचित युतीचा करिष्मा
या निवडणुकीत काँग्रेसने ६५ जागांवर तर वंचित बहुजन आघाडीने ५ जागांवर उमेदवार उभे केले होते. या दोन्ही पक्षांच्या युतीला मतदारांनी कौल दिला असून, काँग्रेसच्या ३२ आणि वंचितच्या ५ उमेदवारांनी विजय मिळवला आहे. दुसरीकडे, सर्व ७० जागांवर लढणाऱ्या भाजपला केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागले. अजित पवार गटानेही ६० जागांवर उमेदवार देऊन जोरदार प्रयत्न केले होते, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये.
प्रभाग रचना आणि लढत
मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांप्रमाणे लातूरमध्येही बहुसदस्यीय प्रभाग रचना होती. १८ प्रभागांमधील ७० जागांसाठी ही निवडणूक झाली. काँग्रेस आणि भाजपमधील या थेट लढतीत स्थानिक प्रश्नांनी आणि युतीच्या गणितांनी निकालाचे चित्र पालटले आहे. आता लातूरमध्ये काँग्रेसच्या रूपाने नवीन सत्ता समीकरण पाहायला मिळणार आहे.









