Bandra Fort- मुंबईतील ऐतिहासिक वारसा असलेल्या वांद्रे किल्ल्यावर (Bandra Fort) पर्यटन विभागाने दारू पार्टी आयोजित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. उबाठाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी या पार्टीचा व्हिडिओ प्रसिद्ध करून महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागानेच तिचे आयोजन केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. या पार्टीवरून राजकीय वातावरण तापल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, या प्रकारामुळे इतिहासप्रेमी संतप्त झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी वांद्रे किल्ल्यावरील या दारू पार्टीच्या ठिकाणी जाऊन उपस्थितांना जाब विचारला. या नागरिकांनी पोलिसांकडे याबद्दल तक्रारही केली. मात्र पोलिसांना न जुमानता ही पार्टी करण्यात आली, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्टीचा व्हिडिओ त्यांनी अखिल चित्रे यांना शेअर केला. हा व्हिडिओ चित्रे यांनी एक्सवर पोस्ट केला. त्यासोबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत म्हटले की, वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महापालिका परवानगी देतेच कशी? महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरू आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणार्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर महाराष्ट्र पर्यटन’ विभाग? नक्की काय सुरू आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे ’सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी (शेलार)?
ते पुढे म्हणाले की, मी फक्त आरोप केले नाहीत, तर पुरावेसुद्धा दिले आहेत. ही एक श्रेणी 2 वारसा जागा आहे. ही जागा मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. इथे दारुची परवानगी देता येते का? राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही परवानगी दिलीच कशी? वांद्रे किल्ल्याचे सुशोभीकरण आशिष शेलार यांनी केलेले आहे आणि त्यांच्याच मतदारसंघात असे कार्यक्रम होत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आहेत म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आयोजित करण्यात येत आहेत का? इथे सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत जलसे होऊ शकतात. पण दारू पार्टी होऊ शकत नाही. ज्याने व्हिडिओ काढले त्यांच्यावरच कारवाई करण्याची धमकी पोलीस देत होते. यावरून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला मी पत्र लिहून कारवाईची मागणी करणार आहे.
सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे. हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचे ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती असल्याचीही टीका त्यांनी केली. या पार्टीवरून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनीही सरकारला धारेवर धरत म्हटले की, किल्ल्यावरील दारू पार्टीला शासनाची परवानगी होती, हे अति झाले आहे. ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य नष्ट करण्याचा यांचा उद्देश आहे. ज्या अधिकार्याने या पार्टीला परवानगी दिली असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशा दारू पार्टीला उत्पादन शुल्क विभाग परवानगी देत असेल तर ही लाच घेऊन दिलेली परवानगी आहे. तर भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम सारवासारव करत म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्या ठाकरेंच्या संयुक्त विद्यमाने होत होत्या, असे त्यांना म्हणायचे का ? कोणत्याही सार्वजनिक स्थळावर अशा गोष्टी होत असतील, तर त्या निदर्शनास आल्यास पोलीस त्यांच्यावर कडक कारवाई करतील. त्यानंतर अशा गोष्टी बंद करतील. अनेक ठिकाणी अशी कारवाई झाली आहे. भविष्यातही ही कारवाई सुरू राहणार आहे.
या पार्टीवरून संताप व्यक्त झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी या घटनेचा व्हिडिओ पाहिलेला नाही. पण मला काही लोकांनी याबाबत सांगितले. जर अशाप्रकारे पार्टीसाठी परवानगी दिली गेली असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले खा. राऊत स्टार प्रचारक









