Dilip Walse Patil: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार दिलीप वळसे ( Dilip Walse Patil) पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) संभाव्य तारखा जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना करत वळसे पाटलांनी निवडणुकीच्या संभाव्य तारखा सांगितल्या. त्यामुळे आयोगाआधीच निवडणूक कार्यक्रमाचा अंदाज सत्ताधारी महायुतीच्या (Mahayuti) वळसे पाटलांना कुणी दिला, असा प्रश्न विचारला जात आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना वळसे पाटील यांनी अधिकृत तारीख जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचे स्पष्ट केले. पण त्याचवेळी स्वतःकडील माहितीनुसार वेळापत्रक सांगितले. त्यांनी दावा केला की, ५ नोव्हेंबरला नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची घोषणा होईल. त्यानंतर १५ डिसेंबरला जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असतानाच महापालिकांच्या निवडणुकाही जाहीर होतील. १५ जानेवारीला मतदान होईल आणि ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण होतील.
दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्व तयारी पूर्ण केली असली तरी अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी १५ ते २० जानेवारीच्या आत घेण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, नगरपरिषद निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आता वळसे पाटील यांनी सांगितलेले संभाव्य वेळापत्रक आणि राज्य निवडणूक आयोगाचे वेळापत्रक सारखेच आहे की त्यात मोठी तफावत आहे, हे थोड्या दिवसांतच कळेल.









