LPG Supply : आखाती युद्धामुळे भारतातील गॅससंकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना आज शिवालिक आणि नंदादेवी ही दोन जहाजे आखातातून तेल घेऊन भारताकडे रवाना झाली आहेत. या दोन्ही जहाजांनी होर्मुजची सामुद्रधुनी पार केली आहे. त्यामुळे या जहाजांवरील धोका टळला आहे. या दोन जहाजांमध्ये एकूण 92,700 मेट्रिक टन गॅस असून, ही जहाजे पुढील दोन ते तीन दिवसांत गुजरातला पोहोचतील. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला असून, गॅस तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे.
इराणने भारतीय जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक करायला मुभा दिल्याची माहिती भारत सरकारने दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फताली यांनीही काल त्याला दुजोरा दिला होता. त्यानुसार भारताची शिवालिक आणि नंदादेवी ही दोन जहाजे आखातातून गॅस घेऊन निघाली. ती 16 आणि 17 मार्च रोजी गुजरातच्या मुंद्रा आणि कांडला बंदरात पोहोचणार आहेत. त्यानंतर ती एका दिवसात मुंबई बंदरात पोहोचू शकतात. भारताचे परराष्ट्र सचिव राजेशकुमार सिन्हा यांनी आज ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारताची आणखी अनेक जहाजे आखातात अडकली असून, त्यांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची म्हणाले की, अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून भारतावर रशियाकडून तेल आयात थांबवण्यासाठी दबाव आणत होती. परंतु इराणसोबतच्या दोन आठवड्यांच्या युद्धानंतर आता अमेरिका भारतासह जगभरातील देशांना रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी भीक मागत आहे. आखाती युद्धाच्या चौदाव्या दिवशी अमेरिकेने आज इराणचे कच्च्या तेलाचे मोठे केंद्र असलेल्या खर्ग बेटावर हल्ला केला. इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी अंदाजे 80 टक्के निर्यात या बेटावरून होते. इराणची तेल ठिकाणे उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने अमेरिकेने हा हल्ला केला. यामुळे संतापलेल्या इराणने सूड उगवण्यासाठी अरब देशातील बंदरे, गोदी आणि अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेने खर्ग बेटावर हल्ला केल्यानंतर तिथे 15 हून अधिक स्फोट झाले आणि अनेक ठिकाणांहून धूर निघताना दिसत होता. अमेरिकेने बेटावरील लष्करी तळ, जोशान सी बेस, विमानतळाचा नियंत्रण टॉवर आणि हेलिकॉप्टर हँगरला लक्ष्य केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. खर्ग बेटानंतर अबू मुसा बेट हे पुढचे लक्ष्य असू शकते, असे म्हटले जात आहे. भविष्यात अहवाज प्रदेशातही कारवाई केली जाऊ शकते. कारण इराणचे बहुतेक तेल आणि वायू येथून काढले जाते.
इराणी अधिकार्यांनी मात्र या हल्ल्यात इराणचे नुकसान झाल्याचा दावा खोडत म्हटले आहे की, खर्ग बेटावरून तेल निर्यात अव्याहतपणे सुरू आहे. तेथील तेल कंपन्यांच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. तेल पुरवठाही विस्कळीत झालेला नाही. या हल्ल्यामुळे चवताळलेल्या इराणने अबू धाबी आणि बहरीनमधील अमेरिकेच्या तीन तळांवर हल्ला केला. त्यात अबू धाबीमधील अल-धफ्रा हवाई तळ आणि बहरीनमधील शेख इसा हवाई तळांवर हल्ले झाले. इराणने सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावरील पाच विमानांवरही हल्ला केला. ही विमाने हवेत इंधन भरून देणारी विमाने होती. याशिवाय अरब देशांनाही थेट धमकी दिली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटले आहे की, इराणला त्याच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे आणि प्रदेशाचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. ज्या ठिकाणांवरून अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत, इराण त्यांना लक्ष्य करू शकतो. कोणत्याही संभाव्य हल्ल्यात नुकसान टाळायचे तर आखातातील लोकांनी बंदरे, गोदी आणि अमेरिकन लष्करी क्षेत्राजवळील क्षेत्रे रिकामी करावीत. इराणच्या धमकीनंतर अमेरिकेने आखातात काम करणार्या त्यांच्या सरकारी कर्मचार्यांना देश सोडून परतण्यास सांगितले आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही तत्काळ देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने रिवॉर्ड्स फॉर जस्टिस अंतर्गत इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्यासह 10 बड्या नेत्यांची माहिती देणार्यांना 10 दशलक्ष डॉलर (अंदाजे 92 कोटी रुपये)चे इनाम जाहीर केले आहे. या यादीत इराणी नेते अली लारीजानी, गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब, अली असगर हेजाझी, याह्या रहीम सफावी आणि इस्कंदर मोमेनी यांचा समावेश आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, हे अधिकारी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित यंत्रणा चालवतात. जे जगभरात हल्ले आणि दहशतवादी कारवाया करतात.
खर्ग बेट महत्त्वाचे केंद्र
खर्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीसाठी प्रमुख टर्मिनल म्हणून ओळखले जाते. हे बेट होर्मुज सामुद्रधुनीच्या वायव्येस सुमारे 483 किमी आणि इराणच्या किनार्यापासून सुमारे 26 किमी अंतरावर स्थित आहे. इराणमधून निर्यात होणार्या सुमारे 90 टक्के तेलवाहू जहाजांची वाहतूक याच बेटावरून केली जाते. आकाराने लक्षद्वीपच्या एकत्रित बेटांपेक्षा लहान असलेले खर्ग बेट इराणच्या तेल उत्पादन व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या बेटावर मोठ्या प्रमाणात कच्चे तेल साठवण्याची क्षमता असून, ते समुद्रमार्गे पाईपलाईनद्वारे तेल आणि वायू प्रकल्पांशी जोडलेले आहे. इराणमधील विविध तेलक्षेत्रांतून कच्चे तेल पाण्याखालील पाईपलाईनद्वारे खर्ग बेटावरील प्रक्रिया केंद्रात आणले जाते.
एलपीजीकडून पीएनजीकडे वळा
आखाती भागातील युद्धस्थितीमुळे इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात असली तरी देशात पाईप गॅसची कोणतीही कमतरता नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. शक्य असल्यास स्वयंपाकासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरऐवजी पाईपद्वारे मिळणार्या पीएनजी गॅसचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. देशातील सुमारे 60 लाख कुटुंबांना त्यांच्या परिसरात पीएनजी सुविधा उपलब्ध असल्याने ते सहजपणे पीएनजीकडे वळू शकतात. यासाठी गॅस वितरण कंपन्यांना नागरिकांना पीएनजी जोडणी मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.











