Maharashtra Budget 2026: राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. यामध्ये शेतकरी आणि तरुणांच्या जोडीला महिला वर्गासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासादायक घोषणांचा पाऊस पडला आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रवास पुढेही अविरत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करत, फडणवीस यांनी महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी नव्या योजनांचा आराखडा सादर केला आहे.
‘लखपती दिदी’ मोहिमेला वेग
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत राज्यातील सुमारे ३७ लाख महिलांनी ‘लखपती दिदी’ होण्याचा बहुमान मिळवला आहे. ही गती कायम राखत आगामी २०२६-२७ या वर्षात आणखी २५ लाख महिलांना या मोहिमेत जोडून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या जीवनमानात मोठी सुधारणा अपेक्षित आहे.
महिला समूहांच्या उत्पादनांसाठी ‘उमेद मॉल’
महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या हाताने बनवलेल्या दर्जेदार वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ जिल्हा विक्री केंद्रे उभारली जाणार आहेत. यामुळे महिलांच्या उत्पादनांना केवळ हक्काची बाजारपेठच मिळणार नाही, तर त्यांच्या कलेला आणि कष्टाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल.
एकल महिलांसाठी विशेष धोरण
समाजातील दुर्लक्षित असलेल्या एकल महिलांच्या प्रश्नांकडे सरकारने विशेष लक्ष वेधले आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण केले जात आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राप्त माहितीचे विश्लेषण करून त्यांच्या कल्याणासाठी एक सर्वसमावेशक आणि सुयोग्य धोरण तयार केले जाणार आहे. महिलांच्या सुरक्षित आणि सन्मानजनक जीवनासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
एकूणच, हा अर्थसंकल्प महिलांना केवळ आर्थिक आधार देणारा नसून त्यांना उद्योजिका बनवण्यावर अधिक भर देणारा ठरला आहे.











