PNG Supply Maharashtra : महाराष्ट्रातील घराघरांत आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये आता ‘पाईप नॅचरल गॅस’ (PNG) पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्यातील गॅस वितरणाचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.
परवानग्यांचा अडथळा दूर
प्रकल्पाचा वेग वाढवण्यासाठी ३० जूनपर्यंत सर्व प्रकारच्या तांत्रिक परवानग्यांची अनिवार्यता काढून टाकण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, या कामासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळाल्या आहेत असे समजून कंपन्यांना प्रत्यक्ष काम सुरू ठेवता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही आणि विविध परवानग्यांसाठी आकारले जाणारे शुल्कही रद्द करण्यात आले आहे. २४ तासांच्या आत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एलपीजीवर मर्यादा, पीएनजीवर भर
एलपीजी सिलेंडरच्या वापरावर काही मर्यादा येत असल्यामुळे सुरक्षित आणि स्वस्त अशा पीएनजी पुरवठ्यावर भर दिला जात आहे. जिथून गॅसची मुख्य पाईपलाईन जाते, तिथे घरगुती तसेच हॉटेल आणि इतर व्यावसायिक उपयोगासाठी कनेक्शन देण्याची प्रक्रिया आता सोपी होणार आहे.
तुमच्या जिल्ह्यात कोणत्या कंपनीकडे आहे जबाबदारी?
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे:
| जिल्हा / विभाग | गॅस पुरवठा करणारी कंपनी |
| मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, लातूर, धाराशिव | महानगर गॅस लिमिटेड |
| पुणे शहर (पिंपरी-चिंचवड, चाकण), नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, बुलढाणा, नांदेड, परभणी | महाराष्ट्र नॅच्युरल गॅस लिमिटेड |
| पुणे जिल्हा (ग्रामीण) | टोरेंट गॅस पुणे लिमिटेड |
| अकोला, हिंगोली, वाशिम, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नंदूरबार | अदानी टोटल गॅस लिमिटेड |
| अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड |
| बीड, जळगाव, जालना | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड |
| नागपूर | एचसीजी नागपूर प्रायव्हेट लिमिटेड |
| चंद्रपूर, वर्धा | मेघा सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन प्रा. लिमिटेड |
| पालघर, ठाणे ग्रामीण | गुजरात गॅस लिमिटेड |
| सोलापूर | आयएमसील लिमिटेड |
| कोल्हापूर | एपीओआयएल गॅस प्रायव्हेट लिमिटेड |
काम कधी सुरू होणार?
राज्य सरकारने परवानग्यांची अट शिथिल केल्यामुळे तांत्रिक अडचणी दूर झाल्या असल्या, तरी या कंपन्या प्रत्यक्ष खोदकाम आणि पाईपलाईन टाकण्याचे काम कधीपासून सुरू करणार, याची निश्चित तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या निर्णयामुळे कामात येणारे प्रशासकीय अडथळे नक्कीच दूर होणार आहेत.











