Shivendraraje vs Congress: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अलीकडेच राजकीय विरोधकांना इशारा देताना, “मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद आहे,” असे ठणकावून सांगितले होते. या विधानावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वाकयुद्ध पेटले आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर सोशल मीडियाद्वारे जोरदार पलटवार केला असून त्यांना छत्रपतींच्या सन्मानाची आठवण करून दिली आहे.
काँग्रेसचे शिवेंद्रराजेंना थेट आव्हान
महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शिवेंद्रराजेंना टॅग करत काही तिखट सवाल विचारले आहेत. काँग्रेसने म्हटले आहे की, जर तुमच्यातील “छत्रपतींची औलाद” खरोखरच जागी असेल, तर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जाहीर झालेल्या ‘पद्मभूषण’ पुरस्काराला उघड विरोध करून दाखवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या नेत्यांसोबत राहून तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल, तर धाडसाने भूमिका घ्या, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे.
जुन्या घटनांचा दिला दाखला
काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये भाजपशी संबंधित नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची यादीच सादर केली आहे. यात प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा उल्लेख केला आहे:
- भगतसिंह कोश्यारी: महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माजी राज्यपालांना केंद्राने पुरस्कार जाहीर केला, तेव्हा तुमची अस्मिता कुठे होती?
- सुधांशू त्रिवेदी व मंगलप्रसाद लोढा: महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली असे म्हणणारे प्रवक्ते आणि आग्रा मोहिमेबद्दल असंबद्ध बोलणारे मंत्री यांच्यावर आपण गप्प का?
- इतर नेते: श्रीपाद छिंदम, प्रशांत कोरटकर आणि विनोद तावडे यांच्या जुन्या प्रकरणांचा दाखला देत काँग्रेसने शिवेंद्रराजेंना विचारले की, या प्रत्येक वेळी आपल्यातील ‘रक्त’ का जागी झाले नाही?
पद्म पुरस्कारावरून संतापाची लाट
२६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला केंद्राकडून भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. कोश्यारी यांनी आपल्या कार्यकाळात महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल केलेल्या विधानांमुळे संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण होते. आता त्यांना पुरस्कार मिळाल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, शिवेंद्रराजेंसारख्या छत्रपतींच्या घराण्यातील नेत्यांनी यावर गप्प राहणे चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे सातारा आणि राज्याच्या राजकारणात शिवेंद्रराजे आता यावर काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









