Crop Damage Survey : राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि पूरस्थितीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारचे नऊ सदस्यांचे पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. हे पथक आजपासून प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुरू करणार आहे.
या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे राज्यातील 68 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर अनेक नागरी भागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच 31,628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे.
यापैकी केंद्र सरकारने 1,566.40 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. आता प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेऊन केंद्र सरकारकडून पुढील मदत पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे.
पथकात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश
सोमवारी मुंबईत दाखल झालेल्या या पथकाने मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांसह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशीही महत्त्वाच्या बैठका घेतल्या. केंद्रीय आंतरिक सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव आर. के. पांडे यांच्या नेतृत्वाखालील या नऊ सदस्यांच्या पथकात विविध केंद्रीय मंत्रालयांचे तज्ज्ञ अधिकारी आहेत.
पथकातील प्रमुख सदस्य: या पथकात कृषी विभाग (डॉ. ए. एल. वाघमारे), वित्त विभाग (कंदर्प पटेल), जलशक्ती मंत्रालय (सत्येंद्र प्रताप सिंग), रस्ते आणि महामार्ग वाहतूक विभाग (विशाल पांडे), ग्रामीण विकास मंत्रालय (अभिषेक राज), ऊर्जा मंत्रालय (करण सारेन), इस्रो (डॉ. एसव्हीएसपी शर्मा) आणि गृह मंत्रालय (आशीष गौर) यांसारख्या महत्त्वाच्या विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दोन दिवसांत प्रमुख जिल्ह्यांचा दौरा
पुढील दोन दिवस हे केंद्रीय पथक राज्याच्या विविध भागातील नुकसानीची पाहणी करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने धाराशिव, सोलापूर, नाशिक आणि वाशिम या सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात अधिकारी राज्याच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांसोबत मिळून प्रत्यक्ष शेतीत झालेले नुकसान आणि नागरी भागातील हानीची तपासणी करतील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने, या पाहणीनंतर केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किती मोठ्या पॅकेजची घोषणा होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा – Prakash Surve: ‘मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी..आई मेली तरी चालेल, पण…’; शिंदे गटाच्या आमदाराच्या विधानामुळे नवा वाद
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








