Digital 7/12 : महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने (Revenue Department) एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेत, डिजिटल सातबारा (Digital 7/12) उताऱ्याला पूर्णपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, घरबसल्या पारदर्शक, जलद आणि कायदेशीर सेवा उपलब्ध करून देणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे.
या निर्णयामुळे आता ग्रामपंचायतीपासून ते उच्च न्यायालयापर्यंत सर्व शासकीय, निमशासकीय, बँकिंग (Banking), कर्ज प्रक्रिया आणि न्यायालयीन कामकाजासाठी डिजिटल स्वाक्षरीने मिळालेले गाव नमुना 7/12, 8-अ आणि फेरफार उतारे वैध मानले जातील.
तलाठी कार्यालयाच्या चकरा संपल्या
यापूर्वी नागरिकांना सातबारा मिळवण्यासाठी तलाठी किंवा सज्जा कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागत होत्या आणि अनेक ठिकाणी अनावश्यक अडवणूक होत असल्याच्या तक्रारी होत्या. ऑनलाइन सातबारा काढल्यानंतरही त्यावर तलाठ्याचा शिक्का किंवा स्वाक्षरी घ्यावी लागत होती, ज्यामुळे गैरप्रकार वाढले होते.
नव्या निर्णयामुळे ही सर्व प्रक्रिया संपुष्टात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 5 नुसार, संगणकीकृत अभिलेख आता मूळ दस्तऐवजाची सत्यप्रत मानले जातील. त्यामुळे तलाठी किंवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याच्या हस्ताक्षराची आवश्यकता राहिलेली नाही.
केवळ ₹15 शुल्क आणि सुरक्षा
नागरिकांना महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून केवळ ₹15 शुल्क ऑनलाइन भरून अधिकृत डिजिटल सातबारा उतारा मिळू शकेल. या उताऱ्यावर डिजिटल स्वाक्षरी, क्यूआर कोड (QR Code) आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असेल, ज्यामुळे त्याची कायदेशीर वैधता सिद्ध होईल.
7/12 उतारा मोफत पाहण्याची सुविधा भूलेख महाभूमी संकेतस्थळावर उपलब्ध आहे, मात्र तो केवळ माहितीपुरताच वापरता येईल. कायदेशीर कामांसाठी मात्र ₹15 शुल्क भरून डिजिटल स्वाक्षरीत उतारा घेणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
हा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 आणि जमीन महसूल अभिलेख व नोंदवह्या नियम, 1971 अंतर्गत लागू करण्यात आला आहे. डिजिटल सातबारा मिळवण्यासाठी खालील टप्पे पाळावे लागतील:
- https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा.
- सर्वेक्षण क्रमांक किंवा मालकाचे नाव निवडून तपशील भरा.
- डिजिटल स्वाक्षरीत 7/12 उतारा पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी ऑनलाइन शुल्क भरा.
- शुल्क भरल्यानंतर उतारा पीडीएफ (PDF) स्वरूपात उपलब्ध होईल.
हे देखील वाचा – Putin India Visit : राजशिष्टाचार बाजूला ठेवत पंतप्रधान मोदींनी केले पुतिनचे स्वागत; मुंबई पासिंगच्या ‘त्या’ खास गाडीची चर्चा









