Eknath Shinde on Maharashtra Farmers Aid: राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,200 कोटींहून अधिक मदत वितरित करण्याचा निर्णय घेतला असून, पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
युद्धपातळीवर मदत आणि पाहणी दौरे
शेतकऱ्यांचे हाल होत असून अनेक ठिकाणी शेतातील मातीही वाहून गेली आहे. अनेक लोकांच्या घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंचनामे येताच, तातडीने मदत दिली जात आहे. गेल्या काही दिवसांत 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांसाठी ₹2,215 कोटींची मदत मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी ₹1,829 कोटी जिल्ह्यांमध्ये जमा झाले आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत उर्वरित मदतही जमा होईल.
राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत, तर मी स्वतः धाराशिवला जाणार आहे. इतर मंत्रीही पाहणी दौऱ्यावर रवाना होणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.
ओला दुष्काळ आणि कर्जमाफीवर योग्य वेळी निर्णय
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे यांनी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याबाबत आणि शेतकरी कर्जमाफीबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात सरकार गंभीर आहे. या संदर्भात आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत, दोन्ही सरकारांकडून मदत केली जाईल, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.”
दरम्यान, पुरामुळे अनेक नागरिक अडकले होते, त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. तसेच, पूरग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक वस्तू, औषधे आणि डॉक्टरांचे पथक पोहोचवण्यात आले आहे. पूर परिस्थितीनंतर साथीचे रोग पसरू नयेत यासाठी आरोग्य विभाग सतर्क असून, आरोग्यमंत्री स्वतः आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा – यंदा दिवाळाला मुहूर्त ट्रेडिंग कधी आहे? जाणून घ्या वेळ आणि तारीख