विकास आणि प्रगती! महाराष्ट्राने पुन्हा एकदा पटकावले देशात अव्वल स्थान, ‘या’ क्षेत्रात केली दमदार कामगिरी

State Ranking 2025

State Ranking 2025 | महाराष्ट्राने पुन्हा एकदा सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.’केअर एज रेटिंग्ज’ने (CareEdge Ratings) जाहीर केलेल्या राज्य मानांकन अहवालानुसार, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक ही राज्ये 2025 मध्ये अव्वल ठरली आहेत. पश्चिम आणि दक्षिण भारतातील राज्यांनी या क्रमवारीत उच्च स्थान पटकावले आहे.

या वार्षिक मानांकनाच्या दुसऱ्या आवृत्तीत, भारतीय राज्यांचे अर्थव्यवस्था, वित्तीय व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, वित्तीय विकास, सामाजिक विकास, प्रशासन आणि पर्यावरण या 7 प्रमुख स्तंभांवर मूल्यांकन करण्यात आले. यासाठी ५० विविध निर्देशकांचा वापर करण्यात आला. मागील आवृत्तीत (2023), महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू ही तीन राज्ये आघाडीवर होती.

महाराष्ट्राने वित्तीय, आर्थिक, वित्तीय व्यवस्थापन आणि सामाजिक मापदंडांमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केल्यामुळे अव्वल स्थान प्राप्त केले आहे. गुजरातने आर्थिक कामगिरीत आघाडी घेतली आहे, तर कर्नाटक औद्योगिक आणि पर्यावरणीय निर्देशकांमध्ये उत्कृष्ट ठरले आहे.

पश्चिम भारतातील राज्यांनी वित्तीय आणि आर्थिक मापदंडांवर उच्च स्थान मिळवले आहे, तर दक्षिण भारतातील राज्यांनी प्रशासन, पर्यावरण आणि सामाजिक परिणामांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. ‘केअर एज रेटिंग्स’च्या अहवालानुसार, पहिल्या पाच क्रमांकांमध्ये पश्चिम आणि दक्षिण भारतीय राज्यांचा दबदबा आहे.

‘अ’ गटात (मोठी राज्ये), महाराष्ट्राने 56.5 च्या एकत्रित गुणांकासह अव्वल स्थान पटकावले, त्यानंतर गुजरातआणि कर्नाटक यांचा क्रमांक लागतो. ‘ब’ गटात (उत्तर-पूर्व, डोंगराळ आणि लहान राज्ये), गोव्याने पहिला क्रमांक मिळवला आहे.

“महाराष्ट्राने वित्तीय विकासात खूप चांगली कामगिरी केली आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे,” असे ‘केअर एज रेटिंग्स’च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ रजनी सिन्हा यांनी सांगितले. वित्तीय विकास गुणांकांमध्ये पतपुरवठा, म्युच्युअल फंड आणि विमा उत्पादनांचा अवलंब आणि व्यापक वित्तीय समावेशाचा विचार करण्यात आला होता.

अर्थव्यवस्था उप-श्रेणीतगुजरातने प्रति व्यक्ती राज्य सकल घरेलू उत्पाद (GSDP), थेट परकीय गुंतवणूक (FDI) आणि सकल स्थिर भांडवल निर्मिती (गुंतवणूक) मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रथम क्रमांक पटकावला.

पंजाब आणि हरियाणा या उत्तर भारतीय राज्यांनी प्रति व्यक्ती वीज उपलब्धता, रेल्वे घनता आणि निव्वळ सिंचनाखालील क्षेत्र (% निव्वळ पेरणी क्षेत्राच्या) मध्ये चांगले गुण मिळाल्याने पायाभूत सुविधा क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. याउलट, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दक्षिण भारतीय राज्यांनी पर्यावरण श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केली.

प्रशासनात, आंध्र प्रदेशने व्यवसायिक वातावरण, न्यायालयीन दोषसिद्धी दर, न्यायालयीन खटले वेळेवर पूर्ण करणे आणि न्यायाधीशांची संख्या यांमध्ये उच्च गुण मिळाल्याने अव्वल स्थान मिळवले.

‘ब’ गटातील राज्यांमध्ये, गोवा आणि मिझोरम यांनी अर्भक मृत्यू दर आणि बहुआयामी गरीबी दरात सुधारणा केल्यामुळे सामाजिक क्रमवारीत आघाडी घेतली. पर्यावरणीय कामगिरीत, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांनी उत्तम कामगिरी केली आहे.