Maharashtra Crop Loss: ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या दोन महिन्यांत राज्यात पावसाचे थैमान सुरू असून तब्बल 30 जिल्ह्यांमधील 195 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित भागातील पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
नुकसानीची एकूण व्याप्ती
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील 17 लाख 85 हजार 714 हेक्टर (42 लाख 84 हजार 846 एकर) शेतजमीन बाधित झाली आहे. या पावसामुळे 654 महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सर्वाधिक बाधित जिल्हे आणि पिके
राज्यातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड, यवतमाळ आणि वाशीम यांचा समावेश आहे.
- नांदेड – 728,049 हेक्टर
- यवतमाळ – 318,860 हेक्टर
- वाशीम – 203,098 हेक्टर
- अकोला – 177,466 हेक्टर
- धाराशिव – 157,610 हेक्टर
- बुलढाणा – 89,782 हेक्टर
- सोलापूर – 47,266 हेक्टर
या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर आणि मूग या प्रमुख खरीप पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यासोबतच काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांचेही नुकसान झाले आहे.
सरकारचे प्रयत्न आणि कृषिमंत्र्यांचे आश्वासन
कृषीमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, “शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” पंचनामे वेगाने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाई दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कृषी विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे या प्रक्रियेवर काम करत आहेत.
हे देखील वाचा – दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला पडतोय ‘काळा’; कारण काय? वाचा