Maharashtra HSC-SSC Result 2025 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी (SSC Results) आणि बारावीच्या (HSC Results) विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच दहावीचा निकाल 15 किंवा 16 मे रोजी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील दोन आठवड्यांमध्ये दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृत तारखेची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी सांगितले की, या वर्षी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेळेत पूर्ण करण्यात आले असून, सध्या गुणांची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी यासोबतच स्पष्ट केले की, निकालाच्या अंतिम तारखेची अधिकृत घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री लवकरच करतील.
निकाल जाहीर होण्यापूर्वीची तयारी
पडताळणीची प्रक्रिया 11 मेपर्यंत पूर्ण होणार असल्याने, त्यानंतर निकाल ऑनलाइन स्वरूपात जाहीर करण्यात येणार आहेत. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या वेबसाइट्सचा वापर करावा, याची माहिती बोर्ड पुढील आठवड्यात अधिकृतपणे जाहीर करणार आहे.
या वर्षी प्रथमच बारावीच्या परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस आधी, म्हणजे 11 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान पार पडल्या. तर दहावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आल्या. बारावीच्या परीक्षेसाठी 15.24 लाख, तर दहावीच्या परीक्षेसाठी 16.39 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
दरम्यान, CISCE ने ICSE (दहावी) आणि ISC (बारावी) परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केले. ICSE निकालात यंदा उत्तीर्णतेचे एकूण प्रमाण 99.09% असून, मुलींचे प्रमाण 99.37% आणि मुलांचे 98.84% आहे. ISC निकालात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 99.45%, तर मुलांचे 98.64% इतके आहे. एकूण 99,551 विद्यार्थ्यांनी ISC परीक्षा दिली होती, यापैकी 98,578 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.









