Maharashtra Legislative Council : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त कोट्यातील रिक्त असलेल्या ५ जागा लवकरच भरल्या जाणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या या नियुक्त्यांच्या संदर्भात आता प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून, लवकरच या जागांवर नवीन सदस्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
निवडीचे निकष आणि प्राधान्य
मिळालेल्या माहितीनुसार, या ५ जागांवर नियुक्ती करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि पक्षसंघटना बळकट करण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाण्याची दाट शक्यता आहे. राज्यपालांच्या माध्यमातून विधानपरिषदेवर नियुक्त होणारे सदस्य हे सहसा कला, साहित्य, विज्ञान, सहकारी चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रांतील तज्ज्ञ असतात. मात्र, आगामी निवडणुकांचे समीकरण पाहता राजकीय अनुभव असलेल्या अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.
विधानपरिषदेचे सद्यस्थितीतील गणित
महाराष्ट्र विधानपरिषदेची एकूण सदस्य संख्या ७८ इतकी आहे. सध्याच्या घडीला या सभागृहात ५५ सदस्य कार्यरत असून तब्बल २३ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांपैकी ९ जागांचा कार्यकाळ येत्या १३ मे २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या या निवडणुकांसाठी विधानसभेतील २८६ आमदारांचे संख्याबळ पाहता, एका जागेसाठी विजयाचा कोटा सुमारे ३६ मतांच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानपरिषदेची रचना कशी असते?
विधानपरिषद हे राज्यातील ‘वरचे सभागृह’ म्हणून ओळखले जाते. हे सभागृह विधानसभेसारखे दर ५ वर्षांनी बरखास्त होत नाही, तर ते एक कायमस्वरूपी सभागृह आहे. सदस्यांची निवड खालीलप्रमाणे विभागलेली असते:
विधानसभा सदस्यांकडून निवड (आमदारांमार्फत) – ३०
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवड – २२
शिक्षक मतदारसंघ – ७
पदवीधर मतदारसंघ – ७
राज्यपाल नियुक्त (विशेष क्षेत्रातून) – १२
एकूण सदस्य संख्या – ७८
राज्यसभा निवडणुकीचेही वेध
विधानपरिषदेसोबतच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या गणितामध्येही मोठे बदल होणार आहेत. राज्यातील राज्यसभेच्या एकूण ७ जागा २ एप्रिल २०२६ रोजी रिक्त होत आहेत. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील ५ राज्यपाल नियुक्त जागा, मे महिन्यात रिक्त होणाऱ्या ९ जागा आणि त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या ७ जागा, यांमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर फेरबदल आणि रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
काय आहे राज्यसभेच मूळ गणित? (Rajyasabha)
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण ७ जागा २ एप्रिल २०२६ मध्ये रिक्त होणार आहेत.
कोणत्या – कोणत्या जागा रिक्त होणार आहेत?
शरद पवार, राष्ट्रवादी, (एसपी)
रामदास आठवले ( भाजपच्या कोट्यातून आरपीआय आठवले गट)
भागवत कराड, भाजप
धैर्यशील पाटील, भाजप
प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना (युबीटी)
रजनी पाटील, काँग्रेस
फौजीया खान, राष्ट्रवादी (एसपी)










