Local Body Elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, राज्य निवडणूक आयोगाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कायदेशीर अडचणींमुळे 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका (Election) पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून जिथे प्रचाराचा धुरळा उडत होता, तिथे अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. ज्या 22 ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, तिथे आता 20 डिसेंबर रोजी मतदान होईल आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांवर 2 डिसेंबर रोजी नियोजित वेळेत मतदान पार पडणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीव्र प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आयोगाने कायद्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, “कुठला कायदा निवडणूक आयोग काढत आहे, ते मला माहीत नाही. माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही.” ते म्हणाले की, उद्या निवडणुका आहेत आणि आज निवडणुका पुढे ढकलणे हे अत्यंत चुकीचे आहे. अनेक उमेदवारांची प्रचाराची मेहनत वाया गेली आहे. निवडणूक आयोग स्वायत्त असले तरी अशाप्रकारे निर्णय घेणे चुकीचेच आहे आणि याबद्दल आयोगाला लवकरच आपले प्रतिनिधित्व दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक पुढे ढकलण्यामागचे नेमके कारण
निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्यामागे न्यायालयीन प्रक्रिया आणि नियमांचे उल्लंघन ही कारणे दिली आहेत. 4 नोव्हेंबर 2025 रोजी 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता.
नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या अपीलांचे निकाल 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर जाहीर झाले. या निकालांमुळे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी आवश्यक असलेला तीन दिवसांचा अवधी न देता थेट मतदान चिन्हे वाटप केली. आयोगाने ही कार्यवाही महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 मधील 17 (1) (ब) या तरतुदींनुसार नियमबाह्य असल्याचे नमूद केले.
निकालांमुळे सदस्यपद किंवा अध्यक्षपद एखाद्या वॉर्डाशी संबंधित असल्यास, तेथे संपूर्ण नगरपरिषद किंवा नगरपंचायतीची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
या 22 ठिकाणच्या निवडणुका लांबणीवर
राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकानुसार 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात पुणे जिल्ह्यातील बारामती; सातारा जिल्ह्यातील फलटण, महाबळेश्वर; यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, पांढरकवडा, वणी; सोलापूरमधील मंगळवेढा, अनगर; अहमदनगरमधील कोपरगाव, देवळाली-प्रवरा, नेवासा, पाथर्डी; तसेच चंद्रपूर, अमरावती, ठाणे, नांदेड, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि हिंगोलीमधील काही नगरपरिषदांचा समावेश आहे.
याशिवाय, मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमधील 17 पालिकांच्या कार्यक्षेत्रातील 38 प्रभागांची निवडणूकही लांबणीवर पडली आहे.
हे देखील वाचा – Ind vs SA : विराट की सचिन? एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कोण? सुनील गावस्कर म्हणाले…









