Eknath Shinde Jai Gujarat Slogan Controversy | पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर “जय गुजरात” (Jai Gujarat) अशी घोषणा दिल्याने महाराष्ट्रात नवा राजकीय वाद पेटला आहे. मराठी विरुद्ध हिंदी भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या या विधानाने विरोधी पक्षांनी, विशेषतः शिवसेना (ठाकरे गटाने) तीव्र टीका केली आहे.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंचे समर्थन करत शरद पवार यांच्या “जय कर्नाटक” घोषणेचा दाखला दिला, तर शिंदे गटाने ठाकरे पिता-पुत्रांचे “जय गुजरात” आणि “जय उत्तरप्रदेश” म्हणणारे जुने व्हिडिओ शेअर केले आहे.
“जय गुजरात” घोषणेचा वाद
पुण्यातील जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात अमित शाह आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर उपस्थित होते. शाह यांनी गुजराती भाषेत जनतेला संबोधित केले, तर शिंदे यांनी भाषण संपवताना “जय महाराष्ट्र, जय गुजरात” अशी घोषणा दिली. त्यांनी 2022 च्या सत्ताबदलाचे श्रेय शाह यांच्या रणनीतीला देत, अमित शाह पर्वतासारखे माझ्या मागे उभे होते, असे म्हटले.
मात्र, शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्याने यावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाकडून यावरून जोरदार टीका केली जात आहे.
याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, “गुजराती समाजाच्या कार्यक्रमात शिंदेंनी जय गुजरात म्हटले, याचा अर्थ त्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झाले असा होत नाही.” त्यांनी शरद पवार यांच्या 2015 मधील बेळगाव येथील “जय कर्नाटक” घोषणेचा दाखला दिला, ज्यावर त्यावेळीही वाद झाला होता.
“मी आपल्याला आठवण करून देतो की, याआधी शरद पवार यांनी चिकोडी येथे छत्रपती शिवाजी महाराजयांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा दिली होती. मग त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर नाही, असं समजायचं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फेब्रुवारी 2015 मध्ये बेळगावमधील (Belgaum) एका कार्यक्रमात शरद पवार यांनी ‘जय हिंद, जय कर्नाटक, जय भारत’ अशी घोषणा दिली होती, ज्यावरून त्यावेळीही त्यांच्यावर टीका झाली होती. फडणवीसांनी मराठी माणसाचे वैश्विक योगदान अधोरेखित करत संकुचित विचार चुकीचे असल्याचे सांगितले.
तर दुसरीकडे शिंदे गटाने ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील “जय गुजरात” आणि आदित्य ठाकरे यांचा “जय उत्तरप्रदेश” म्हणणारा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर शेअर करत प्रत्युत्तर दिले आहे.