Home / महाराष्ट्र / Maharashtra Election 2026 : मतदारांनी कोठडीतल्या उमेदवारांनाच धाडलं महापालिकेत! नेत्यांचा थेट तुरुंगातून मोठा विजय

Maharashtra Election 2026 : मतदारांनी कोठडीतल्या उमेदवारांनाच धाडलं महापालिकेत! नेत्यांचा थेट तुरुंगातून मोठा विजय

Maharashtra Election 2026 : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या १६ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या निकालांनी संपूर्ण राज्याला चकित केले आहे. या निवडणुकीत...

By: Team Navakal
Maharashtra Election 2026
Social + WhatsApp CTA

Maharashtra Election 2026 : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या १६ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या निकालांनी संपूर्ण राज्याला चकित केले आहे. या निवडणुकीत केवळ प्रस्थापित नेत्यांनाच कौल मिळाला नाही, तर विविध गंभीर गुन्ह्याखाली तुरुंगात असलेल्या उमेदवारांनीही दणदणीत विजय मिळवला आहे.

खून, दहशतवाद आणि फसवणुकीचे आरोप असूनही या ‘तुरुंगवारी’ करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी थेट महापालिकेत धाडले आहे.

१. जालन्यात खळबळ: गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी विजयी

जालना महानगरपालिकेत सर्वात धक्कादायक निकाल वॉर्ड क्रमांक १३ मध्ये लागला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातही पांगारकरचे नाव आले होते. नुकतीच जामिनावर सुटका झालेल्या पांगारकरला जालन्यातील मतदारांनी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून पसंती दिली आहे.

२. जळगावचा ‘कोल्हे पॅटर्न’: पूर्ण कुटुंबच विजयी

जळगाव महानगरपालिकेत माजी महापौर आणि शिवसेना (शिंदे गट) नेते ललित कोल्हे यांनी तुरुंगातूनच प्रभाग क्रमांक ११ मध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. बोगस कॉल सेंटर चालवल्याच्या आरोपावरून ते सध्या नाशिकच्या कारागृहात आहेत. विशेष म्हणजे, ललित कोल्हे यांच्यासह त्यांची आई सिंधुताई कोल्हे आणि मुलगा पियुष कोल्हे हेदेखील विजयी झाले असून, संपूर्ण कोल्हे कुटुंबाने कोठडीत असतानाही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

३. पुण्यात ‘आंदेकर कुटुंबाचा’ विजय

पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वांचे लक्ष होते. येथे आयुष कोमकर हत्या प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर या दोघींनी दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष न्यायालयाच्या परवानगीने तुरुंगातूनच अर्ज भरणाऱ्या या दोघींच्या विजयामुळे पुण्याच्या राजकारणात गुन्हेगारीच्या प्रभावावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

४. सोलापूर: खुनाच्या गुन्ह्यातील शालन शिंदे विजयी

सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या शालन शंकर शिंदे यांनी बाजी मारली आहे. मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणात त्या सध्या तुरुंगात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून सरवदे यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे सोलापूरचे राजकारण तापले असतानाच, मतदारांनी मात्र तुरुंगात असलेल्या शिंदे यांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या