Maharashtra Police Uniform – महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police force) शिस्त आणि सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या ‘खाकी स्वॅग’ (‘khaki swag)प्रकारच्या व्हिडिओंच्या ट्रेंडवर बंदी घालण्यात आली असून, यापुढे पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेशात असताना रिल्स, मिनी-व्ह्लॉग किंवा कोणताही सोशल मीडिया व्हिडिओ तयार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.यासंदर्भात विशेष शाखेने अधिकृत परिपत्रक जारी केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
स्पेशल ब्रँचचे पोलीस उपायुक्त दत्तात्रेय कांबळे (Deputy Commissioner of Police Dattatray Kamble) यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे की, गणवेशात व्हिडिओ बनवताना अनेकदा अनवधानाने पोलीस ठाण्यातील अंतर्गत जागा, सरकारी वाहने, शस्त्रे आणि महत्त्वाची उपकरणे कॅमेऱ्यात कैद होतात. त्यामुळे पोलीस दलाची गोपनीयता आणि ऑपरेशनल सुरक्षा धोक्यात येऊ शकते. काही अधिकारी व कर्मचारी वैयक्तिक लोकप्रियतेसाठी संवेदनशील पार्श्वभूमीवर व्हिडिओ बनवत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

राज्यातील सुमारे 51 हजार पोलीस (police)कर्मचाऱ्यांना गणवेशातील रील, मिनी-व्ह्लॉग किंवा इतर सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट करणे तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करताना पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
या ट्रेंडवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलीस सोशल मीडिया लॅबला (Mumbai Police Social Media Lab) विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. ही लॅब विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हे देखील वाचा –
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ नाराज
वाल्मिक कराडच्या मुलांपासून आम्हाला धोका’; महादेव मुंडेंच्या पत्नीची थेट एसपींकडे धाव











