Maharashtra Politics : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक प्रमुख बदल घडत आहेत. आणि या निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच महायुतीमधील राजकीय वाद मात्र चव्हाट्यावर आलेले दिसत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये आपसातील तक्रारी वारंवार वाढताना दिसत आहेत. शिवाय ताजा असणारा ठाण्यातील राडा. भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धुसपूस पुन्हा एकदा या राड्याच्या माध्यमातून सर्वांसमोर आली. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार देखील टाकला होते. केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ह्या कॅबिनेट बैठकीत उपस्थित होते. तर काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जावून पक्षप्रवेशाच्या घटनांवर मोठी नाराजी व्यक्त केली होती. पण त्यांना फडणवीसांकडून हवा तसा पाठिंबा मिळालाच नाही.
शिवाय याच तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाबरोबरच्या दिल्लीतील वाढत्या भेटीगाठीमुळे शिंदेंच राजकीय वजन कमी झालंय का? अश्या चर्चाना देखील आत उधाण आलं आहे. मागच्या वर्षीच्या यशानंतर शिंदेनी बऱ्याचदा अमित शहांची भेट घेतली. आणि आता त्यांनी पुन्हा एकदा बुधवारी दिल्लीत एकनाथ शिंदेनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे अर्थात अमित शहांकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे शिंदेंच्या पक्षातून भाजपात होणार घाऊक पक्ष प्रवेश.
शिंदेंची शिवसेना आणि भाजपातील वाढत्या समस्या या सगळ्यावर अमित शाहांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असल्याचे देखील बोलले जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेने अचानकपणे घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवरील नाराजीमुळे भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे. यावर अमित शहांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाकडे बोट दाखविण्यापेक्षा शिवसेनेने आपले नेते आणि पदाधिकारी सांभाळून ठेवावे. अन्य पक्षात ते जाणार नाहीत याची देखील शिवसेनेने काळजी घ्यावी, अशी सूचना अमित शाहांनी केल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून जाहीरपणे नाराजीचे प्रदर्शन करू नये अशी ताकीत देखील शाहांनी शिंदे यांना दिल्याची माहिती आहे.
या सगळ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी सगळं सुरळीत असल्याचा दावा केला असून आम्ही महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहोत”, असे देखील त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा महायुतीतील तणावाच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. “आगामी स्थानिक निवडणुका आम्ही एकजुटीने लढू असा विश्वास देखील व्यक्त केला. पण खार पाहायला गेलं तर तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये या युतीसाठी फारसा उत्साह पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे आता यापुढचे महायुतीचे भवितव्य काय हे आगामी काळात समजेलच.
हे देखील वाचा – Eknath Shinde : भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशाने एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढणार?









