Home / महाराष्ट्र / ‘शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर, पण…’,  चंद्रहार पाटलांचे ट्विट चर्चेत

‘शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर, पण…’,  चंद्रहार पाटलांचे ट्विट चर्चेत

Chandrahar Patil | राज्यातील आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असताना, उद्धव ठाकरे...

By: Team Navakal
Chandrahar Patil |

Chandrahar Patil | राज्यातील आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असताना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) गटाला सत्ताधारी शिंदे गटाकडून मोठे आव्हान मिळत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर सुरू झालेल्या गळतीला आळा घालण्यात ठाकरे गट अपयशी ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी थेट खुलं आव्हान दिलं आहे. “हिम्मत असेल तर चंद्रहार पाटील यांचा प्रवेश थांबवून दाखवा.”, असे आव्हानच शिरसाट यांनी ठाकरे गटाला दिले आहे. शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार, पाटील हे 9 जून रोजी शिंदे गटात सामील होणार आहेत.

मात्र, एकीकडे संजय शिरसाट यांनी चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या तारखेची घोषणा केली असताना, पाटील यांनी मात्र शिंदे गटात जाण्याविषयी कोणताही निर्णय झाला नसल्याचे म्हटले आहे.

चंद्रहार पाटील यांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, “शिवसेना शिंदे गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर आहे, मात्र मी अजून निर्णय घेतलेला नाही. सध्या मी बाहेरगावी असून कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेईन.”

या पार्श्वभूमीवर सांगलीतील राजकीय समीकरणे पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीवेळी याच मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात उमेदवारीवरून तणाव निर्माण झाला होता. अखेर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, तर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढून विजय मिळवला. चंद्रहार पाटील मात्र तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

त्यामुळे आता आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करणार की उद्धव ठाकरेंसोबतच राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या