Home / महाराष्ट्र / Maharashtra Rain: राज्यात पावसाने विश्रांती घेतली;अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती कायम

Maharashtra Rain: राज्यात पावसाने विश्रांती घेतली;अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती कायम

Maharashtra Rain : राज्यातील काही भागात आज पावसाने विश्रांती घेतल्याने पाऊस थांबला असला तरी धरणांमधून होत असलेल्या विसर्गामुळे अनेक गावांमध्ये...

By: Team Navakal
Maharashtra Rain


Maharashtra Rain : राज्यातील काही भागात आज पावसाने विश्रांती घेतल्याने पाऊस थांबला असला तरी धरणांमधून होत असलेल्या विसर्गामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती कायम राहिली. गेला आठवडाभर पावसाचे (Rain) थैमान सुरू असलेल्या मराठवाड्यातही (Marathwada) आज पावसाचा जोर कमी होता. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना उद्या यलो अलर्ट जारी केलेला आहे.

मुंबईत आज सकाळी काही सरी कोसळल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरी दिवसभर आभाळ दाटून आले होते. मुंबईलगतच्या ठाणे व पालघर जिल्हयातील काळू, भातसा, वैतरणा, तानसा, सुर्या, पिंजाळ, उल्हास, बारवी, वालधुनी नद्यांना पूर आलेले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये अद्यापही पाणी साचले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कालपासूनच पाऊस सुरू असून उद्याही या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मराठवाड्यात आज पावसाचा जोर कमी राहिला. काही भागात उनही पडले. जायकवाडी, गोसेखुर्द आदी धरणांमधून विसर्ग सुरु असल्याने अनेक गावे पाण्याखील गेली आहेत. जालन्यात पूरस्थितीमुळे एक हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. छत्रपती संभाज नगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक नद्या नाल्यांना पूर आले होते. तिथली स्थिती आता निवळली आहे. गोदावरी नदी पात्रात मोठा विसर्ग सुरु असल्याने बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव आणि परळी तालुक्यातील नदीकाठच्या ६० गावांचा संपर्क तुटला आहे. धाराशिव जिल्ह्यातील सिना कोळेगाव धरणातून सुरु असलेला विसर्ग आज कमी करण्यात आला. मात्र, विसर्ग कमी-जास्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नांदेड जिल्ह्यात पावसाने कालपासून विश्रांती घेतल्याने ग्रामीण भागात पूरपरिस्थिती ओसरली आहे. त्याचवेळी विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडीसह इतर धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून जवळपास तीन लाख क्युसेक विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीचा पूर कायम आहे. नांदेड शहरातील अनेक भागांत पाणी शिरले आहे. नांदेड महापालिकेने शहरातील ९५० नागरिकांना निवारा केंद्रात हलवले आहे. सोलापूर जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस झाला नसला तरी अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत मोठा पाऊस झाला. येवला, इगतपुरी, निफाड तालुक्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पूरस्थिती कायम आहे. निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वरमधून ८८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या बंधाऱ्यावरून जाणारा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव व एरंडोल तालुक्यातील पुरामुळे कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून लिंबू व केळीच्या बागांनाही मोठा फटका बसला. नागपूरमधील पूरस्थिती निवळली असली तरी अद्यापि शेतांमध्ये पाणी ओसरलेले नाही. विदर्भात आज पावसाने विश्रांती घेतली असून अनेक धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. कोल्हापूर, सातारा व सांगली भागात काल दुपारपासून पावसाने उघडीप घेतली आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याऐवजी या धरणातील गाळ काढण्याची मागणी या भागातील पूरग्रस्तांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातील नायगाव व मायगाव या समोरासमोर वसलेल्या गावांना पुराचा फटका बसला, त्यामुळे मायगावातील नागरिकांनी महामार्गावरच रात्रभर आश्रय घेतला. याच रस्त्यावर आपापल्या जनावरांसह ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अनेकांनी आपला तात्पुरता संसार थाटला असून पाणी ओसरल्यानंतरच ते गावात जाता येणार आहेत. प्रशासनाने त्यांच्यासाठी याच ठिकाणी जेवणाचीही व्यवस्था केली. त्यामुळे नागरिकांना अक्षरशः रस्त्यावर बसूनच जेवावे लागले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या