HSRP Number Plate : महाराष्ट्रात हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स अनिवार्य करण्यासाठी परिवहन विभागाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर, आता १८ फेब्रुवारीपासून राज्यभर कडक तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्या वाहनांवर अद्याप जुन्या नंबर प्लेट आहेत, त्यांच्यावर आता थेट दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आता कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही.
१ कोटीहून अधिक वाहनांची टाळाटाळ
परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात अजूनही १ कोटीहून अधिक वाहनांनी नवीन नंबर प्लेट बसवलेली नाही. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी हा नियम लागू आहे. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांमध्ये नियम पाळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. पुण्यात केवळ ३५ टक्के वाहनांनीच आतापर्यंत नवीन प्लेट्स बसवल्या आहेत, जे प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
कोणाला मिळणार दिलासा?
ज्या वाहनधारकांनी ३१ डिसेंबर २०२५ च्या अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन नोंदणी केली आहे, पण अद्याप प्लेट बसवणे बाकी आहे, अशांना १५ दिवसांची सवलत देण्यात आली आहे. मात्र, ज्यांनी अद्याप नोंदणीची प्रक्रियाच सुरू केलेली नाही, अशांना रत्यावर तपासणी दरम्यान मोठा दंड भरावा लागू शकतो.
केवळ नंबर प्लेटच नाही, तर ‘या’ कागदपत्रांचीही होणार तपासणी
१८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत आरटीओ अधिकारी केवळ नंबर प्लेटच तपासणार नाहीत, तर इतर कागदपत्रांचीही कडक तपासणी केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने: १. नोंदणी प्रमाणपत्र (RC) २. वैध विमा (Insurance) ३. पीयूसी (PUC) प्रमाणपत्र ४. वाहन चालवण्याचा परवाना (Driving Licence)
जर यापैकी कोणतेही कागदपत्र अवैध किंवा उपलब्ध नसेल, तर दंडाची रक्कम वाढू शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
फिटमेंट सेंटरवर प्लेट्सचा खच
अनेक फिटमेंट सेंटर्सनी तक्रार केली आहे की, हजारो नंबर प्लेट्स तयार असूनही वाहनधारक त्या बसवण्यासाठी येत नाहीत. वेळेवर अपॉइंटमेंट न घेतल्यामुळे आणि नंतर घाई केल्यामुळे यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे दंड टाळण्यासाठी वाहनधारकांनी तातडीने आपली अपॉइंटमेंट पूर्ण करून नवीन नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सरकारने केले आहे.









