Maharashtra Scholarship Exam: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या उद्देशाने, राज्य सरकारने शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्तरामध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता इयत्ता पाचवी ऐवजी चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी सातवी मध्ये आयोजित केली जाईल.
या बदलांची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे.
Maharashtra Scholarship Exam: परीक्षेचे वेळापत्रक आणि नावात बदल
- अंतिम जुनी परीक्षा: 2025-26 या शैक्षणिक सत्रात इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन अखेरचे म्हणून फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल.
- नवीन परीक्षा: इयत्ता चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे 2026 च्या कोणत्याही रविवारी करण्यात येईल.
- नियमितता: 2026-27 या वर्षापासून पुढे, ही परीक्षा कायमस्वरूपी इयत्ता चौथी आणि सातवी या स्तरावरच नियमितपणे आयोजित केली जाईल.
- नवीन नावे: यापुढे या परीक्षा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी स्तर) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी स्तर) या नवीन नावांनी ओळखल्या जातील.
Maharashtra Scholarship Exam: शिष्यवृत्तीच्या दरात आणि संचामध्ये वाढ
विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने शिष्यवृत्तीच्या दरात सुधारणा करण्यात आली असून, कालावधी प्रत्येकी तीन वर्षांचा असेल:
इयत्ता | प्रति महिना रक्कम | प्रति वर्ष रक्कम |
चौथी | 500 रुपये | पाच हजार रुपये |
सातवी | 750 रुपये | सात हजार पाचशे रुपये |
शिष्यवृत्ती संच (Scholarship Quota): इयत्ता चौथी आणि पाचवीकरिता प्रत्येकी 16,693 आणि इयत्ता सातवी आणि आठवीकरिता प्रत्येकी 16,588 शिष्यवृत्ती संच मंजूर राहतील.
परीक्षेसाठी पात्रता आणि वयोमर्यादा
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्राचा रहिवासी असलेले आणि शासनमान्य शाळांमध्ये (शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/सीबीएसई/आईसीएसई इत्यादी) इयत्ता चौथी किंवा सातवीत शिकणारे विद्यार्थी पात्र असतील.
परीक्षेचा स्तर | विद्यार्थ्यांसाठी कमाल वय (1 जून रोजी) | दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कमाल वय (1 जून रोजी) |
प्राथमिक (इयत्ता चौथी) | 10 वर्षे | 14 वर्षांपेक्षा जास्त नसावे |
उच्च प्राथमिक (इयत्ता सातवी) | 13 वर्षे | 17 वर्षांपेक्षा जास्त नसावे |
परीक्षा शुल्क
- बिगर मागासवर्गीय: एकूण शुल्क 200 रुपये (प्रवेश शुल्क 50 रुपये + परीक्षा शुल्क 150 रुपये).
- मागासवर्गीय व दिव्यांग: एकूण शुल्क 125 रुपये (प्रवेश शुल्क 50 रुपये + परीक्षा शुल्क 75 रुपये).
- याशिवाय, प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी दोनशे रुपये नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल.
शिष्यवृत्तीचा उद्देश: सन 1954-55 पासून कार्यान्वित असलेल्या या योजनेचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे आणि इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावणे हा आहे.
हे देखील वाचा – देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईकवर खास ऑफर; दिवाळीला खूपच स्वस्तात खरेदीची संधी