Maharashtra SSC HSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी आता सीसीटीव्ही आणि ड्रोन यंत्रणेद्वारे काटेकोर देखरेख ठेवण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. यासाठी राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून, तिच्या नेतृत्वास शिक्षण आयुक्त नियुक्त आहेत. समितीत राज्य मंडळाचे अध्यक्ष, सर्व परीक्षेत्रांचे विशेष पोलीस महानिरीक्षक, विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक, योजना शिक्षण संचालक तसेच राज्य मंडळाचे सचिव यांचा समावेश आहे.
राज्यस्तरीय दक्षता समितीचे प्रमुख उद्दिष्ट दहावी व बारावीच्या परीक्षांचे वातावरण शांत, तणावमुक्त आणि गुणवत्तापूर्ण ठेवणे आहे. तसेच राज्यभरात ‘कॉपीमुक्त’ अभियान प्रभावीपणे राबवणे, परीक्षा केंद्रांमध्ये नियमबद्ध आणि काटेकोर सुरक्षा सुनिश्चित करणे याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. समिती सदस्यांना परीक्षा काळात केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
दक्षता समितीच्या नियमानुसार, परीक्षा केंद्रापासून ५०० मीटरच्या परिसरातील छायांकित प्रतीची दुकाने बंद ठेवणे, जिल्ह्यातील उपद्रवी व संवेदनशील केंद्रांची माहिती संकलित करणे, सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, उपद्रवी आणि संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे सतत देखरेख ठेवणे, तसेच भरारी व बैठक पथके व पोलीस बंदोबस्त तैनात करणे यांसारख्या उपाययोजना केल्या जातील.
या उपाययोजनांमुळे परीक्षेच्या दिवसांत विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वातावरण सुरक्षित राहील आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित होईल, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.









