ZP Election Results: महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शनिवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज, सोमवारी निकालाचा दिवस उजाडला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत ग्रामीण महाराष्ट्रातील सत्तेचे चित्र स्पष्ट होईल. या निकालाकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे लक्ष लागले आहे.
७ हजार उमेदवारांची धाकधूक वाढली
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 2,624 उमेदवार, तर पंचायत समितीच्या 1,462 जागांसाठी 4,814 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 12 जिल्ह्यांमध्ये सरासरी 68.28 टक्के मतदान झाले असून, मतदारांचा हा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- सर्वाधिक मतदान: परभणी जिल्ह्यात 74.89 टक्के इतके भरघोस मतदान झाले.
- सर्वात कमी मतदान: रत्नागिरी जिल्ह्यात केवळ 55.79 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.
प्रशासकीय तयारी आणि सुरक्षा
मतमोजणीसाठी राज्यातील सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने चोख तयारी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र केंद्रे उभारण्यात आली असून, मतमोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर केले जाणार असून कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
२० जिल्हा परिषदांची प्रतीक्षा कायम
एकीकडे १२ जिल्ह्यांचे निकाल येत असताना, राज्यातील इतर 20 जिल्हा परिषदांची निवडणूक मात्र अद्याप अधांतरी आहे. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या निवडणुका रखडल्या आहेत. न्यायालयाचा निकाल लवकरच येण्याची चिन्हे असली तरी, शाळा-महाविद्यालयांच्या आगामी परीक्षा पाहता या निवडणुका घेण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
ग्रामीण भागातील पाणीप्रश्न, रस्ते, आरोग्य आणि स्थानिक विकासकामांचे मुद्दे या निवडणुकीत केंद्रस्थानी होते. राजकीय आघाड्या आणि युतींच्या समीकरणांमुळे निकालात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









